हवामानातील नाट्यपूर्ण घडामोडींमुळे थंडीचे ‘सरकार’ स्थापन होईना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 06:35 IST2019-11-11T00:33:59+5:302019-11-11T06:35:41+5:30
‘महा’ चक्रीवादळामुळे मुंबईत पडलेला अवकाळी पाऊस; अशा हवामानातील नाट्यपूर्ण घडामोडींनंतर अद्याप थंंडीचे सरकार स्थापन झालेले नाही.

हवामानातील नाट्यपूर्ण घडामोडींमुळे थंडीचे ‘सरकार’ स्थापन होईना
मुंबई : पावसाळ्याच्या चार महिन्यांहून अधिक कोसळलेल्या सरीवर सरी, हिटविना गेलेला ऑक्टोबर, ‘क्यार’सह अरबी समुद्रात उठलेल्या ‘महा’ चक्रीवादळामुळे मुंबईत पडलेला अवकाळी पाऊस; अशा हवामानातील नाट्यपूर्ण घडामोडींनंतर अद्याप थंंडीचे सरकार स्थापन झालेले नाही. एव्हाना आॅक्टोबर हिटसह दिवाळीदेखील संपली; तरीही थंडीची चाहूल लागली नसल्याने, मुंबईकरांना आता थंडीसाठी डिसेंबरची वाट पाहावी लागण्याची चिन्हे हवामानातील बदलाने दिली आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर असलेले बुलबुल चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर सुंदरबनजवळ धडकले असून, त्याची तीव्रता कमी झाली आहे. ते आता बांगलादेश आणि लगतच्या किनारी आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यासह विदर्भात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत तापमान सरासरीच्या जवळपास होते. ११ ते १४ नोव्हेंबर या काळात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरातील आकाश अंशत: ढगाळ राहील.
>केव्हा पडणार थंडी
प्रत्यक्षात किमान तापमानात घट नोंदविण्यात आली की थंडी वाढते, असा सर्वसाधारण समज असतो. प्रत्यक्षात तसे नसते. तर हवामान खात्याच्या माहितीनुसार, जेव्हा कमाल तापमानात घट नोंदविण्यात येते, तेव्हा थंडी वाढते.
>शीत वारे गारठ्यात भर घालतात
उत्तर-पश्चिम दिशेकडून वाहणारे शीत वारे गारठ्यात भर घालतात. हिमालयावरून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होते. उत्तर पश्चिम भारत आणि मध्य भारतातील सर्वच राज्ये गारठतात. हिमालयाचा पश्चिम भाग, पंजाब, हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ थंडीने गारठतो.
>‘ताप’दायक बदलामुळे मुंबईकर घामाघूम
जोपर्यंत उत्तरेकडून दक्षिणेकडे शीत वारे वाहत नाहीत आणि जोवर कमाल तापमानात घट होत नाही, तोवर तरी थंडी दूरच आहे. या कारणास्तव सध्या हवामानातील ‘ताप’दायक बदल मुंबईकर चांगलेच घामाघूम झाले आहेत.
थंडीसह मुंबई धूलिकणांनी बेजार
५/१/२०१९ - मालाड, बीकेसी आणि अंधेरीमध्ये शनिवारी सर्वाधिक धूलिकणांची नोंद ‘सफर’ने केली. मुंबई शहरात माझगाव, वरळी आणि कुलाब्यातही धूलिकणांची अधिक नोंद झाली. मुंबईचे किमान तापमान शनिवारी १५.२ अंश नोंदविण्यात आले.
नीचांकी तापमान
२७ डिसेंबर, २०१८ - उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे शीत वारे वाहिले. याचा परिणाम म्हणून मुंबईसह महाराष्ट्र गारठला. मुंबईचे किमान तापमान १२.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. या मोसमातील हे नीचांकी किमान तापमान होते. हिमालयाकडून वाहत असलेल्या शीत वाºयांमुळे पंजाब, हरयाणा,
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये थंडीचा कडाका वाढला. या वाºयाचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला. मुंबईसह राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान खाली घसरले.
>मुंबईदेखील महाबळेश्वरएवढीच गारठली
९/१/२०१९
मुंबई आणि महाबळेश्वरचे किमान तापमान १३ अंश नोंदविण्यात आले, मुंबईदेखील महाबळेश्वरएवढीच गारठली. उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे शीत वारे वाहत होते. शीत वाºयांमुळे मुंबईसह महाराष्ट्र गारठला. शीत वाºयांचा प्रभाव मराठवाड्यासह विदर्भावरही होता. जळगाव ६, नाशिक ६.९, डहाणूूू १५.६ अंश.
१०/२/२०१९
मुंबई आणि महाबळेश्वरचे किमान तापमान सारखे म्हणजेच १२ अंश नोंदविण्यात आले.
>पाऊस, हिमवृष्टीसह गारठा
३१/१/२०१९ - उत्तर भारतात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, तेथे होत असलेली हिमवृष्टी आणि पाऊस; वातावरणातील
या प्रमुख बदलांमुळे देशासह महाराष्ट्रातील शीतलहर कायम होती. मुंबईतही गारवा टिकून होता.
>भटिंडा - ०़७
१/१/२०१९ - मुंबईचे किमान तापमान १४.८ अंश नोंदविण्यात आले. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ४.६ अंश नोंदविण्यात आले. उत्तर प्रदेश, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, पूर्व मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि तेलंगणा येथे तुरळक ठिकाणी थंडीची लाट आली. पंजाबमधील भटिंडा येथे सर्वात कमी किमान तापमान ०़७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे़