Join us

डेब्रिजमुळे रस्ते झाले उंच-सखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 02:17 IST

खड्डे बुजविण्याची २४ तासांची मुदत हुकल्याने, पालिका अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे.

मुंबई : खड्डे बुजविण्याची २४ तासांची मुदत हुकल्याने, पालिका अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे. त्यात खड्डे भरण्यासाठी लागणाºया ‘कोल्डमिक्स’ या मटेरिअलचा साठाही उपलब्ध नसल्याने, पालिकेने थेट विटा आणि डेब्रिजने खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. भायखळा आणि चिंचपोकळी परिसरातही बुधवारी लाल विटांनी पालिकेचे कर्मचारी खड्डे भरताना दिसून आले. मात्र, ही तात्पुरती मलमपट्टी असून, एका पावसातच हे खड्डे उखडतील. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे पुन्हा या खड्ड्यांची चाळण होणार आहे.भायखळा पूर्वेकडील जिजामाता उद्यानासमोरच्या मार्गावर रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे बुजविण्यात आले आहेत. शिवाय, या ठिकाणी भूमिगत गटारांच्या झाकणाच्या बाजूचे सिमेंटही उखडल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. परिणामी, याचा वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. भायखळा पुलावरून येणाºया वाहनांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती येथे ड्युटीवर असणाºया वाहतूक पोलिसांनी दिली.चिंचपोकळी स्थानकाच्या पूर्वेकडील रस्त्यांवरील खड्ड्यांत खडी भरण्यात आली आहे. संत जगनदे या मुख्य मार्गावरील खड्ड्यांमध्येही खडी भरल्याने रस्त्याची समान पातळी नष्ट झाली असून, त्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.या विभागातील पी. डीमेलो मार्गावर अवजड वाहनांचे प्रमाण अधिक आहे. या मार्गावर पालिका प्रशासनाने डेब्रिजचा ढिगारा आणून ठेवला असून, त्या माध्यमातून खड्डे भरले जात आहे. बुधवारी दुपारी हे काम सुरू असताना पालिका कर्मचाºयांना विचारणा केली असता, वरिष्ठांकडून तात्पुरते या मटेरिअलने खड्डे भरण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर, ‘कोल्डमिक्स’ उपलब्ध झाल्यावर पुन्हा एकदा हे खड्डे भरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. डॉकयार्ड स्थानकाच्या सिग्नल असलेल्या चौकातही मोठे खड्डे डेब्रिजने भरले आहे. परिणामी, या खड्ड्यांमुळे गेल्या आठवड्याभरात दुचाकी चालकांचे ४-५ किरकोळ अपघात झाल्याची माहिती स्थानिक दुकानदार रेहमान महंमद यांनी दिली. याविषयी स्थानिक नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्याशी संपर्क साधला असता, पालिकेच्या विभागीय कार्यालयाकडे पाठपुरावा करत असल्याची माहिती त्यांनी दिली.>...तर आंदोलन करणारखड्डे बुजविण्यासाठी योग्य मटेरिअल न वापरल्याने, परिसरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. तात्पुरत्या स्वरूपात जे मिळेल त्या विटा, डेब्रिज आणि खडीने खड्डे भरल्याने रस्त्यांमध्ये उंच-सखल भाग निर्माण झाला आहे. आम्ही याविषयी पाठपुरावा करत असून, प्रशासनाने कोणतीही पावले न उचलल्यास पुढच्या आठवड्यात आंदोलन करणार आहोत.- विजय लिपारे, मनसे विभाग अध्यक्ष.>‘माझ्या विभागात खड्डेच नाहीत’याविषयी, स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे यांना विचारले असता, माझ्या प्रभागात खड्डेच नाहीत. त्यामुळे ते बुजविण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :खड्डेमुंबई महानगरपालिका