Join us  

डीआरआयकडून तस्करीतील ४० किलो सोन्याचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 3:16 AM

दोन महिन्यांत १८५ किलो सोने जप्त : आरोपींच्या शोधात पथक केरळला रवाना, आतापर्यंत १२ जणांवर कारवाई

मुंबई : महसूल संचालनालयाच्या अन्वेषण विभागाच्या पथकाने (डीआरआय) सोने तस्करी करणाऱ्या ‘त्या’ टोळीकडून आणखी ७५ किलो सोने जप्त केले आहे. या प्रकरणातील मोहम्मद आसिफ कारतुकडी अब्बास व मोहम्मद फासिल अबोबकर हे संशयित ४० किलो सोने घेऊन फरार झाले आहेत. ते केरळमार्गे दुबईला गेले असल्याचे विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यांच्या शोधासाठी केरळला पथक रवाना झाले असून यासंदर्भात देशातील सर्व विमानतळ प्राधिकरणाला सूचना (लूक आऊट नोटीस) बजावण्यात आली आहे.

डीआरआयने शुक्रवारी शोएब मोहम्मद आणि त्याचा मुलगा अब्दुल अहद यांना केरळ येथून अटक करून त्यांनी नऊ कारमध्ये लपवलेला २४ कोटी ६० लाख किमतीचा ऐवज जप्त केला. या टोळीतील मुख्य सुत्रधाराकडून २८ मार्चला डोंगरी परिसरातून ११० किलो सोने जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी आतापर्यंत १२ जणांवर कारवाई करण्यात आली असून फरार कारतुकडी व अबोबकर यांचा शोध सुरू आहे.

कारतुकडी केरळ तर अबोबकरने दुबईला पळ काढल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली. तस्करी करणाºया या टोळीचा मुख्य सूत्रधार निसार अलियार (४३) याचे ते भागीदार असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी देशातील सर्व विमानतळ प्राधिकरणाला सूचना (लूक आऊट नोटीस) बजावण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण १२ जणांना अटक झाली आहे.

डीआरआयच्या पथकाने २८ मार्चला डोंगरी परिसरातून दोन मोटारी ताब्यात घेत त्यात लपविलेले ४५ किलो सोने जप्त केले होते. तसेच त्या परिसरातील काही फ्लॅट व दुकानांवर छापा टाकून तस्करी करण्यात आलेले आणखी ५५ किलो सोने जप्त केले होते. या प्रकरणी मुख्य सूत्रधार निसार अलियार (४३) याच्यासह झव्हेरी बाजार येथील सराफ हॅपी सिंग धाकड, मनोज जैन व अन्य सात जणांना अटक करण्यात आली आहे.

या टोळीने एकूण २२५ किलो सोने आयात केले असल्याची माहिती डीआरआयच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी अन्यत्र लपविलेल्या सोन्याचा शोध घेण्यासाठी पुणे, केरळ, कोचीन, गुजरात या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली. शुक्रवारी या टोळीतील शोएब मोहम्मद आणि त्याचा मुलगा अब्दुल अहद यांना अटक करून त्यांच्याकडील ९ मोटारीत लपविलेले तब्बल ७५ किलो सोने जप्त करण्यात आले. काळ्या व सिल्वर कलरचे सोने कारच्या डिकीचा अर्धा पत्रा कापून त्याखालील दोन गोणीत लपविले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद आसिफ कारतुकडी अब्बास व मोहम्मद फासिल अबोबकर यांच्याकडे आणखी ४० किलो सोने असल्याचे उघड झाले असून पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत जप्त केलेल्या १८५ किलो सोन्याची किंमत सुमारे ६० कोटी इतकी आहे. दोघे फरार केरळ परिसरात असल्याच्या वृत्ताला डीआरआयचे उपायुक्त समीर वानखेडे यांनी दुजोरा दिला.

दोन वर्षांपासून कारमधून सोन्याची तस्करीसोने तस्करी करणाऱ्या टोळीचे नेटवर्क आंतरराज्य असून सोने लपविण्यासाठी ते सुस्थितीतील मोटारींचे काही भाग तोडून त्यातील विविध ठिकाणी सोने लपवत असत. त्यानंतर संबंधित ठिकाणी कारने जाऊन त्याची डिलिव्हरी केली जात असे. २०१७ पासून ते अशा प्रकारे तस्करी करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :सोनंगुन्हेगारी