मुंबई : दारूच्या नशेत पोटच्या मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंधेरी पूर्व परिसरात घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी परशुराम कांबळे (४७) याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. कांबळे हा अंधेरीतील आशीर्वाद सोसायटीत पत्नी, १७ वर्षीय मुलगा व मुलीसह राहतो. या मुलांची आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते; मात्र वडील काहीही काम करत नसून त्यांना दारूचे व्यसन आहे. १९ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुलगा घरात टीव्ही पाहत असताना परशुराम दारू पिऊन आला. त्याने विनाकारण शिवीगाळ केल्याने मुलगा रागाने घरातून निघून गेला. त्याने घडलेला प्रकार आईला सांगितला.
रात्री पावणे नऊच्या सुमारास इमारतीच्या आवारात मुलगा आईशी बोलत असताना परशुराम देखील त्या ठिकाणी आला. त्याने दोघांनाही शिवीगाळ करत चाकूने मुलावर हल्ला केला. यात मुलाच्या उजव्या हाताला तसेच गळ्याला दुखापत झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परशुरामला ताब्यात घेतले.