नालासोपाराच्या पेल्हारमध्ये ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; १३ कोटींचे एमडी केले जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 06:25 IST2025-10-27T06:25:02+5:302025-10-27T06:25:02+5:30
अमली पदार्थाची विक्री आणि उत्पादन करणाऱ्या पाच आरोपींना

नालासोपाराच्या पेल्हारमध्ये ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; १३ कोटींचे एमडी केले जप्त
मुंबई : परिमंडळ ६ च्या अमली पदार्थविरोधी पथकाने नालासोपारा (पूर्व) येथील पेल्हार परिसरात मेफेड्रोन (एमडी) तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून तब्बल १३ कोटी ४४ लाख ५३ हजार रुपयांचा अमली पदार्थ आणि कच्चा माल जप्त केला. या कारवाईत अमली पदार्थाची विक्री आणि उत्पादन करणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
परिमंडळ ६ च्या पथकाला ५ ऑक्टोबर रोजी अमली पदार्थ विक्रीसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर टिळक नगर परिसरात सापळा रचण्यात आला. त्यावेळी एका व्यक्तीकडून ५७.८४ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. या प्रकरणी टिळक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तपासादरम्यान पथकाने मुंबई आणि मीरा रोड परिसरातून आणखी चारजणांना अटक केली. या आरोपींच्या चौकशीतून पेल्हार, नालासोपारा (जि. पालघर) येथील रशीद कंपाऊंड, खैरपाडा, भावखळ येथे मेफेड्रोन उत्पादन सुरू असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून तेथून ६ किलो ६७५ ग्रॅम एमडी व उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल व प्लांटचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला.
पाच आरोपी ताब्यात
अमली पदार्थ विक्रीतील चार आरोपी आणि उत्पादन करणाऱ्या टोळीतील एक आरोपी अशा एकूण पाचजणांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त (परिमंडळ ६) समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वरिष्ठ निरीक्षक मनीषा कुलकर्णी, तपास अधिकारी मैत्रानंद खंदारे, विलास पवार, विजयसिंह देशमुख, सुशांत साळवी, अजय गोल्हार आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी यशस्वीपणे पार पाडली.