Join us  

दुष्काळाच्या धर्तीवर ओल्या दुष्काळात सवलती द्या- मुख्यमंत्री फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 5:32 AM

विमा कंपन्यांनी जास्तीतजास्त भरपाई द्यावी, यासाठी राज्य स्तरावर बैठका झाल्या आहेत.

मुंबई : अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या धर्तीवर सवलती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. रोजगार हमी योजनेद्वारे नुकसानग्रस्त शेताच्या सफाई कामाचा समावेश करून शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या भागांत विविध मंत्र्यांनी दौरे केले होते. त्याचा अहवाल सादर करण्यासाठी बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्र्यांनी बैठक झाली. यावेळी संबंधित पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील नुकसान, शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात या वर्षी झालेला अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, पूर परिस्थिती आदी घटना ४० वर्षांत प्रथमच इतक्या तीव्रतेने घडल्या आहेत. राज्यात सर्वच भागांत पीक परिस्थिती चांगली असताना, या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून त्यांच्या खात्यात तातडीची मदत जमा करण्यासाठी प्रयत्न करावेत. दुष्काळी परिस्थितीत ज्या सोयी-सवलती दिल्या जातात, त्या ओल्या दुष्काळातही द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.विमा कंपन्यांनी जास्तीतजास्त भरपाई द्यावी, यासाठी राज्य स्तरावर बैठका झाल्या आहेत. केंद्रीय गृह, तसेच कृषिमंत्रीदेखील विमा कंपन्यांची लवकरच बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शेतकरी आणि शेतमजुरांना सावरण्यासाठी रोजगार, अन्नसुरक्षा यासारख्या उपाययोजनांनी दिलासा देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रपाऊसदेवेंद्र फडणवीस