Scam Alert: वाहन चालकांनो, ‘RTO’ कधीच ‘एपीके’ पाठवत नाही; लायसन्स व्हेरिफिकेशनच्या आडून लूट
By गौरी टेंबकर | Updated: December 4, 2025 14:00 IST2025-12-04T13:58:08+5:302025-12-04T14:00:31+5:30
RTO Challan Scam Alert: सामान्य नागरिकांपासून पोलिसांपर्यंत अनेक जण या सापळ्यात अडकत आहेत. वाढत्या घटनांना आळा बसण्यासाठी आरटीओने नागरिकांना आवाहन केले आहे.

Scam Alert: वाहन चालकांनो, ‘RTO’ कधीच ‘एपीके’ पाठवत नाही; लायसन्स व्हेरिफिकेशनच्या आडून लूट
- गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबई
आरटीओच्या नावाखाली फिरणाऱ्या बनावट एपीके फाइल्सचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. आरटीओ चलन, ड्रायव्हिंग लायसन्स व्हेरिफिकेशन, व्हेइकल अपडेट्स आदी नावांनी नागरिकांच्या मोबाइलवर पोहोचणाऱ्या या फाइल्स प्रत्यक्षात डेटा चोरणारे मालवेअर ठरत आहेत. या लिंकवर क्लिक करताच क्षणात माहिती हॅकर्सच्या हाती जाते आणि खाते रिकामे होण्याची वेळ येते.
सामान्य नागरिकांपासून पोलिसांपर्यंत अनेक जण या सापळ्यात अडकत आहेत. वाढत्या घटनांना आळा बसण्यासाठी आरटीओने नागरिकांना आवाहन केले आहे. आम्ही कधीच एपीके पाठवत नाही, असा स्पष्ट इशारा दिला असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
फाइलचा गैरवापर करून थेट बँक खात्यावर डल्ला
आरटीओ अथवा अन्य एपीके फाइलमध्ये मालवेअर (डेटा चोरणारे सॉफ्टवेअर) असतात. तुम्ही एकदा ते डाऊनलोड केले की, तुमचे व्हाॅट्सॲप खाते तर कधी कधी अख्ख्या ग्रुपचे मोबाइल क्रमांक हॅक होण्याची भीती असते.
मोबाइल तुमचाच मात्र त्याचा ॲक्सेस वापरत तुमच्या बँक खात्यापर्यंत जाण्याची मजल हे भामटे मारतात आणि त्यातील रक्कम अगदी सहजपणे काढून घेतात.
पोलिसही लक्ष्य; ॲप डाऊनलोड होताच ३ लाख लंपास
विधानभवनातील वरिष्ठ सुरक्षा अधिकारी असलेल्या पोलिस निरीक्षकाने आरटीओ चलन नावाची एपीके फाइल हॉट्सॲप ग्रुपवर महत्त्वाची माहिती असावी, असे समजून क्लिक केली. ॲप डाउनलोड होताच फॉर्म भरताना बँक तपशिलांची मागणी झाल्याने त्यांनी ती डिलीट करूनही त्यांच्या खात्यातून ३ लाख रुपये काढले. याप्रकरणी ताडदेव पोलिसात गुन्हा दाखल आहे.
ट्रॉम्बे पोलिसांच्या मोहल्ला कमिटी ग्रुपमध्येही जुलैमध्ये हॅकरने एपीके फाइल शेअर केली होती, जी उघडताच एका पोलिसाच्या बँक खात्याचा वापर करत ठगांनी त्यांच्या नावे कर्ज काढून रक्कम वळवली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

बनावट एपीके फाइल्स हे नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेला गंभीर धोका आहेत. सजगता, पडताळणी आणि त्वरित तक्रार नोंदवणे, हेच यावर उपाय आहेत.
- संजय शिंत्रे, पोलिस उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर, मुंबई
परिवहन विभागाकडून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती केलेली आहे. चलनाच्या एपीके लिंक आमच्याकडून कधीच पाठवलेल्या नाहीत. त्यामुळे खऱ्या खोट्या लिंकची शहानिशा करावी. याबाबत आमच्याकडूनही वारंवार सांगण्यात येत असून, नागरिकांनी याला बळी पडू नये.
- विवेक भीमनवार, राज्य परिवहन आयुक्त