Join us

डीआरआयने पकडले ४ कोटी ८४ लाखांचे सोने, चार अटकेत; विमानतळा कर्मचाऱ्यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:48 IST

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडून सोने घेऊन ते विमानतळाबाहेर आणण्याचे काम ते करत होते, असा उलगडा तपासादरम्यान झाला आहे...

मुंबई : केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी सोने तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत त्यांच्याकडून ४ कोटी ८४ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. या प्रकरणी मुंबई विमानतळ परिसरातून चार जणांना अटक करण्यात आली असून या टोळीतील दोन जण विमानतळावर कामाला होते. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडून सोने घेऊन ते विमानतळाबाहेर आणण्याचे काम ते करत होते, असा उलगडा तपासादरम्यान झाला आहे.

व्ही. व्ही. पाटील, आर. एस. जाधव, ए. फहाद आणि ए. ए. ओग्नया अशी अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. आर. एस. जाधव हा मुंबईत सोन्याच्या तस्करीचे रॅकेट चालवत होता. त्याला व्ही. व्ही. पाटील आणि ए. ए. ओग्नया हे विमानतळावर काम करणारे कर्मचारी सोने बाहेर आणून देण्यास मदत करत होते. हे कर्मचारी विमानतळावर कामाला आल्यापासून डीआरआयचे अधिकारी त्यांच्यावर पाळत ठेवून होते. थोड्यावेळाने हे कर्मचारी विमानतळाच्या पार्किंगमध्ये गेले आणि तिथे आर.एस.जाधव याचा फोन त्यांना आला. तो विमानतळाबाहेर या कर्मचाऱ्यांची वाट पाहात होता. अधिकाऱ्यांनी या दोघांना पकडल्यावर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अन्य दोघांना विमानतळाच्या बाहेरून अटक करण्यात आली. 

टॅग्स :सोनंविमानतळ