Join us  

जनतेच्या स्वप्नातील दिवाळी कुठेय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 7:36 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून नोटाबंदी आणि जीएसटी निर्णयावरुन भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून नोटाबंदी आणि जीएसटी निर्णयावरुन भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ''सगळ्याच क्षेत्रात अंधकार पसरलेला असताना जनतेलाच आता या दिवाळीच्या निमित्ताने नव्या प्रकाशवाटा शोधाव्या लागतील. जनतेच्या स्वप्नातील दिवाळी कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न आता तरी सरकारने करायला हवा'. आपल्याच सणांवर बंदी आणि फटाक्यांवर निर्बंध कशासाठी? असे एक ना अनेक प्रश्न जनतेला सतावत आहेत',असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.  ''आधी नोटाबंदी आणि नंतर जीएसटी अशा लागोपाठ आलेल्या दोन संकटांनी देशातील अर्थव्यवस्थेला मरगळ आली आहे. दिवाळीचा सण सालाबादप्रमाणे येणारा उत्सव म्हणून पार पडेल, पण आज देशाच्या अर्थव्यवस्थेचे जे दिवाळे वाजले आहे त्याचे काय? ‘अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली?, असा प्रश्नदेखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.  काय आहे आजचे सामना संपादकीय?मराठी जनतेचा आणि एकूणच हिंदूधर्मीयांचा सर्वाधिक उत्साहाचा सण सुरू झाला आहे. दिवाळी हा सणच उत्साहवर्धक असला तरी यंदा जनतेमध्ये खरोखरच किती उत्साह आहे, हा प्रश्नच आहे. कारणे काहीही असोत, पण उत्साह दुर्मिळ झाला हे मात्र वास्तव आहे. अगदी हातात भिंग घेऊन शोधायला निघावे तरी उत्साहाने संचारलेला माणूस सापडत नाही. कष्टकरी जनता, शेतकरी, मध्यमवर्गीयांपासून ते व्यापारी, उद्योजक मंडळींपर्यंत सगळ्यांची हीच अवस्था आहे. असे असले तरी सण म्हटले की उसने अवसान आणून का होईना ते साजरे करावेच लागतात. महाराष्ट्रातील नव्हे देशातील दिवाळीही यंदा अशीच सुरू आहे. कुटुंबीयांच्या आनंदासाठी, घरातील कच्च्या-बच्च्यांचे कोडकौतुक करण्यासाठी सण हाच एकमेव आधार असतो. त्यामुळे ऋण काढून का होईना सण साजरे करावेच लागतात. त्यातही सण दिवाळीसारखा असेल तर त्याचा काही वेगळाच तामझाम असतो. आर्थिक परिस्थिती कशीही असो, प्रत्येक जण दिवाळीचा हा थाट आणि डौल सांभाळण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करतोच. त्यामुळेच दिव्यांचा आणि प्रकाशाचा उत्सव असलेला हा मंगलमय सोहळा साजरा करण्यासाठी सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांचीच घरे-दारे आज सजली आहेत. पणत्यांमध्ये तेवत असणाऱ्या दिव्यांनी घरांचे उंबरठे उजळून टाकले आहेत.  अंगणातील आखीव-रेखीव, रंगीबेरंगी रांगोळ्या, दाराबाहेर आणि बाल्कन्यांमध्ये प्रकाशमान झालेले आकाशकंदील, फराळाचा घमघमाट आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल

असा सगळा माहौल सर्वत्र दिसतो आहे. शिवाय फटाक्यांच्या धडाडS धूम आवाजात लहान मुलांसोबतच घरातील ज्येष्ठ मंडळीही दुरून का होईना आनंद घेतेच. तो घ्यायलाच हवा. सुखाचे चार क्षण हे शेवटी आपल्या कुटुंबातच शोधावे लागतात. सर्व कुटुंबीयांना एकत्र आणणाऱ्या दिवाळीसारख्या सणाची निर्मितीही कदाचित यासाठीच झाली असावी. यंदा तर दिवाळी तब्बल ६ दिवसांची आहे. सोमवारी वसुबारसेला दीपोत्सवास प्रारंभ झाला. मंगळवारी धनत्रयोदशीला धनाची पूजा झाली. दिवाळीचे हे दोन दिवस तर सरले. आज नरक चतुर्दशीला  घरोघरी अभ्यंगस्नान होईल. भगवान श्रीकृष्णाने  नरकासुराला ठार केले तो हा दिवस. अन्यायाचा प्रतिकार करून असत्यावर  सत्याने मिळवलेला विजय हे या दिवसाचे महात्म्य आहे. आज देशातील एकूणच परिस्थिती पाहता सगळा असत्याचाच बोलबाला आहे. खोटी स्वप्ने दाखवून जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या राज्यकर्त्यांचा प्रतिकार करण्याची तयारी जनतेला आतापासूनच करावी लागेल. गुरुवारी लक्ष्मीपूजन होईल. आपल्या घरात सदैव लक्ष्मी वास्तव्यास असावी, अशी यामागील धारणा आहे. लक्ष्मीची  मनोभावे आराधना करतानाच भविष्यात पुन्हा नोटाबंदीसारखा नरकासुर माजू नये आणि पै-पै करून जमवलेली आपली लक्ष्मी नाहिशी करू नये, अशीही प्रार्थना जनतेला करावी लागेल. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा शुक्रवारी आहे. नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करणे आणि खरेदीसाठी सर्वोत्कृष्ट दिवस ही दिवाळी पाडव्याची ओळख आहे. खास करून नवीन घर, दागदागिन्यांची खरेदी या दिवशी केली जाते. मात्र

आधी नोटाबंदी आणि नंतर जीएसटी अशा लागोपाठ आलेल्या दोन संकटांनी देशातील अर्थव्यवस्थेला मरगळ आली आहे. बांधकाम व्यवसाय, सराफा व्यावसायिक आणि एकूणच व्यापारी मंडळी गेली १०-११ महिने ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. पाडव्याच्या मुहूर्ताला या पेठांवर प्रथमच गर्दी होणार असली तरी पूर्वीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीला ३० टक्के तरी व्यवसाय कमी होईल, अशी ओरड व्यापाऱ्यांनी आधीच सुरू केली आहे. भाऊबिजेच्या पवित्र सणाने शनिवारी दिवाळीची सांगता होईल. दिवाळीचा सण सालाबादप्रमाणे येणारा उत्सव म्हणून पार पडेल, पण आज देशाच्या अर्थव्यवस्थेचे जे दिवाळे वाजले आहे त्याचे काय? ‘अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत? आधीच्या सरकारने कायमचे संपवलेले लोडशेडिंग पुन्हा का सुरू झाले? महागाई कमी करू असे म्हणणाऱ्यांनी ती आणखी का वाढवली? उद्योगधंदे का झोपताहेत? बेरोजगारी का वाढतेय? आहे त्या नोकऱ्याही का जात आहेत? आपल्याच सणांवर बंदी आणि फटाक्यांवर निर्बंध कशासाठी? असे एक ना अनेक प्रश्न जनतेला सतावत आहेत. स्वप्नातून जागी झालेली जनता आता प्रश्न विचारू लागली आहे. प्रश्नकर्त्यांच्या घरी जाऊन नोटिसांचे बॉम्ब फोडणे हे त्याचे उत्तर खचितच नाही. सगळ्याच क्षेत्रात असा अंधकार पसरलेला असताना जनतेलाच आता या दिवाळीच्या निमित्ताने नव्या प्रकाशवाटा शोधाव्या लागतील. दिवाळी म्हणजे आनंद. पण हा आनंदच हिरावून घेतला जात असेल तर कसे व्हायचे? अजूनही वेळ गेलेली नाही. जनतेच्या स्वप्नातील दिवाळी कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न आता तरी सरकारने करायला हवा!

 

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपानोटाबंदी