गृहस्वप्न साकार, डोळ्यांत आनंदाश्रू; संक्रमण शिबिरात ३५ ते ५० वर्षे राहात होते, अखेर म्हाडाची लॉटरी लागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 18:28 IST2025-04-25T18:27:15+5:302025-04-25T18:28:03+5:30
आयुष्यात ३५ ते ५० वर्षे संक्रमण शिबिरांत काढलेल्या रिहवाशांचे गृहस्वप्न गुरुवारी साकार होताच त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. निमित्त होते ते म्हाडाच्या मास्टर लिस्ट लॉटरीचे.

गृहस्वप्न साकार, डोळ्यांत आनंदाश्रू; संक्रमण शिबिरात ३५ ते ५० वर्षे राहात होते, अखेर म्हाडाची लॉटरी लागली
आयुष्यात ३५ ते ५० वर्षे संक्रमण शिबिरांत काढलेल्या रिहवाशांचे गृहस्वप्न गुरुवारी साकार होताच त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. निमित्त होते ते म्हाडाच्या मास्टर लिस्ट लॉटरीचे. आता म्हाडाच्या वतीने १० दिवसांचे विशेष शिबिर घेण्यात येणार असून त्यात कागदपत्रे सादर केल्यानंतर विजेत्यांना घराचा ताबा दिला जाणार आहे.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे बृहतसूची समितीद्वारे उपकरप्राप्त इमारतींमधील पात्र भाडेकरू व रहिवासी यांना कायमस्वरुपी घरांचे वितरण करण्यासाठी गुरुवारी संगणकीय लॉटरी काढण्यात आली. म्हाडाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात ही लॉटरी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. उपकरप्राप्त इमारतींमध्ये वास्तव्याला असलेल्या पात्र भाडेकरू, रहिवाशांना कायमस्वरुपी निवासस्थानी हमी देण्याचे उद्दिष्ट या माध्यमातून साधले जात आहे.
म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात गुरुवारी काढलेल्या लॉटरीत १०५ विजेत्यांना घरे देण्यात आली.
३७ वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहत होतो. म्हाडाने सहकार्य केले म्हणून आज स्वत:चे घर मिळाले. आज मी ७१ वर्षांचा आहे. जिवंत असताना घर मिळाले याचा जास्त आनंद आहे.
- वसंत मोकल
घरासाठी ३० वर्षे वाट पाहिली. वाट पाहून कंटाळा आला. आता नंबर आला. घर मिळाले याचे समाधान आहे. आनंद व्यक्त करत नाही पण म्हाडाने मोठे काम केले आहे.
- बळीराम नवघर
कन्नमवार नगरमधील संक्रमण शिबिरात ५० वर्षे झाली राहत होतो. आज दीर्घ काळाची प्रतीक्षा संपल्याचा आनंद आहे.
- नरेश थळे
१९८५ पासून प्रतीक्षा नगरमधील संक्रमण शिबिरात राहत आहे. आज म्हाडाच्या मास्टर लिस्टच्या लॉटरीतून घर मिळाले याचा आनंद आहे.
- विश्वनाथ त्रिमन
आई-वडिलांचे निधन झाले. ३५ वर्षे झाली घराची वाट पाहात होतो. आज घर मिळाले याचा आनंद आहे. म्हाडाचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.
- शांतीलाल यादव
कुलाब्यात १९८२ पासून संक्रमण शिबिरात राहत आहे. आता मुलगा लग्नाचा झाला. २०१० साली म्हाडाने मास्टर लिस्ट सुरू केली. तळमजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना घर मिळण्यात खूप अडचणी आहेत. आता म्हाडाने यावर तोडगा काढला.
- गणेश भालेराव
संक्रमण शिबिरात बरीच वर्षे राहत होतो. २० वर्षांत जागा मिळेल, असे वाटत होते. मात्र ४० वर्षे लागली. आता यापुढे रहिवाशांना असा त्रास होऊ नये. कारण घराची वाट बघत बघत आम्ही ज्येष्ठ नागरिक झालो. लोकांची जुन्या घरासोबत किंवा जुन्या जागेसोबत अटॅचमेंट असते. त्यामुळे म्हाडाने यापुढे जलद प्रक्रिया करावी.
- वासुदेव आंबेकर