मुुंंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे चौथ्या टप्प्यात गिरणी कामगारांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील बॉम्बे डाइंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाइंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांची संगणकीय सोडत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवार, १ मार्चला सकाळी ११ वाजता काढण्यात येईल. या तीन मिलमधील १७ हजार गिरणी कामगारांचा सोडतीमध्ये समावेश आहे. या कार्यक्रमाचे आयोजन वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडा मुख्यालयात करण्यात आले आहे.मुंबई पालिका क्षेत्रातील बंद पडलेल्या गिरण्यांमधील गिरणी कामगारांना घरे देण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. त्या अनुषंगाने मुंबई मंडळातर्फे वडाळा येथील बॉम्बे डाइंग मिल गृहप्रकल्पांतर्गत ७२० सदनिका बांधण्यात आल्या आहेत. बॉम्बे डाइंग (स्प्रिंग मिल) येथेही २६३० सदनिका आणि लोअर परेल येथील श्रीनिवास मिलच्या जागी ५४४ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. मुंबईतील सर्वांत उच्चभ्रू ठिकाणी उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील २२५ चौ. फुटांच्या वन बीएचके स्वरूपातील सदनिका अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त आहेत.आधुनिक काळाची गरज लक्षात घेता वडाळा येथील बॉम्बे डाइंग मिल गृहप्रकल्पाच्या आवारात १५ मजल्यांचे वाहनतळ इमारत (पार्किंग टॉवर) उभारण्यात आले आहे.
गिरणी कामगारांच्या घरांची 1 मार्चला सोडत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 03:28 IST