Join us

नालेसफाई केली, कचरा तसाच पडून; पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी तुंबण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:59 IST

मध्य रेल्वेच्या सायन, कुर्ला, जीटीबीनगर, वडाळा, चुनाभट्टी, गोवंडी या स्थानकांदरम्यान दरवर्षी अतिवृष्टीमुळे पाणी तुंबते.

मुंबई : मध्य रेल्वेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मार्गालगतच्या नाल्यांची व परिसराची सफाई केली असली, तरी अनेक ठिकाणी नाल्यातून काढलेला गाळ व कचरा नाल्याच्या कडेलाच पडून आहे. त्यामुळे नालेसफाईचा उद्देश खरेच सफल होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मध्य रेल्वेच्या सायन, कुर्ला, जीटीबीनगर, वडाळा, चुनाभट्टी, गोवंडी या स्थानकांदरम्यान दरवर्षी अतिवृष्टीमुळे पाणी तुंबते. हे लक्षात घेऊन नाले, रेल्वे रूळ व परिसरातील गाळ, चिखल आणि कचरा हटवण्याचे काम जोरात सुरू आहे. यासाठी मॅक स्पेशल ट्रेन, जेसीबी, पोकलेन मशीन आणि शेकडो कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र, नाल्यातून काढलेला गाळ व कचरा नाल्यालगतच टाकण्यात येत असल्यामुळे तो पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता आहे. 

सफाईचे प्रयत्न निष्फळ विशेषतः कुर्ला-सायन, सायन-माटुंगा, वडाळा-जीटीबी नगर आणि चुनाभट्टी परिसरात ही समस्या अधिक गंभीर आहे. त्यामुळे नालेसफाई होऊनही पाणी तुंबण्याचा धोका टळेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. याशिवाय रुळालगतच्या वस्त्यांमधून नागरिक कचरा नाल्यांत व रुळांवर टाकत असल्यामुळे सफाईचे प्रयत्न निष्फळ ठरण्याची शक्यता आहे.

११२ पंप बसविणारपावसाळ्यात रेल्वे सेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेने विशेष उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार ३३ संवेदनशील ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. याठिकाणी एकूण ११२ पंप बसवण्यात येणार आहेत. 

टॅग्स :मुंबईपाऊसलोकल