नालेसफाईची कामे ‘फास्ट ट्रॅक’वर, मध्य रेल्वेची ७५, तर पश्चिम रेल्वेची ८० टक्के सफाई पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 11:45 IST2025-05-17T11:43:51+5:302025-05-17T11:45:17+5:30
मुंबईसह राज्यात ३१ मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होईल, अशी शक्यता आहे. पावसाळ्यात रुळांमध्ये पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी नालेसफाई होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने रुळांलगत असलेली गटारे, नाले स्वच्छ असणे आणि त्यातून पाण्याचा योग्य निचरा होणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेच्या निधीतून रेल्वे प्रशासन ही कामे करीत आहे.

नालेसफाईची कामे ‘फास्ट ट्रॅक’वर, मध्य रेल्वेची ७५, तर पश्चिम रेल्वेची ८० टक्के सफाई पूर्ण
मुंबई : यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने नालेसफाईला गती दिली आहे. मध्य रेल्वेने आतापर्यंत ७५ टक्के, तर पश्चिम रेल्वेने ८० टक्के नालेसफाई पूर्ण केली आहे. ३१ मेपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईसह राज्यात ३१ मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होईल, अशी शक्यता आहे. पावसाळ्यात रुळांमध्ये पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी नालेसफाई होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने रुळांलगत असलेली गटारे, नाले स्वच्छ असणे आणि त्यातून पाण्याचा योग्य निचरा होणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेच्या निधीतून रेल्वे प्रशासन ही कामे करीत आहे.
मायक्रो टनेलिंगचे काम मार्गी - एप्रिलपासून सुरू झालेल्या नालेसफाईच्या कामात मध्य रेल्वेने आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण केले आहे. रूळांवर पाणी साचू नये म्हणून मायक्रो टनेलिंगचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
सायन-कुर्ला, विक्रोळी-घाटकोपर आणि सँडहर्स्ट रोडजवळ या प्रणालीच्या माध्यमातून पाणी थेट महापालिकेच्या मुख्य नाल्यात सोडले जाणार आहे. याशिवाय कुर्ला-चुनाभट्टीदरम्यान हार्बर मार्गावर पाणी साचण्याच्या समस्येवर तोडगा काढत रुळांची उंची वाढविण्यात आली आहे.
१०४ पंप, ३५ फ्लड गेट, ६१ ठिकाणी सर्किट्स स्वच्छ
पश्चिम रेल्वेच्या हद्दीत ५८ नाले आणि ५५.८ किमी लांबीच्या ड्रेनेज सिस्टीमची सफाई आणि गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. रुळांवर पाणी साचण्याची शक्यता कमी असली तरी खबरदारी म्हणून १०४ पंप, ३६ फ्लड गेट बसविले आहेत. ६१ ठिकाणी ट्रॅक सर्किट्स स्वच्छ केले आहेत. ग्रॅण्ट रोड, गोरेगाव, मालाड, माटुंगा आदी स्थानकांजवळ रूळ उंचावर नेले आहेत.
रेल्वे मार्गालगतच्या वस्त्यांमध्ये जागृती
रेल्वे रुळांवर कचरा टाकल्याने नाल्यांतील पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. परिणामी, पाणी साचते. विशेषतः प्लास्टिक पिशव्या नाल्यांच्या ग्रीलमध्ये अडकतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अभियांत्रिकी व व्यावसायिक विभागाच्या माध्यमातून रुळांलगतच्या वस्त्यांमध्ये जनजागृती सुरू केली आहे.
तंत्रज्ञानाचा वापर
पश्चिम रेल्वेने यंदा नालेसफाईसाठी ड्रोनसोबत तरंगत्या कॅमेराचा वापर केला आहे. हा कॅमेरा सुमारे ६० लाखांचा भाडेतत्त्वावर घेण्यात आला आहे. एका शिफ्टमध्ये २० मॅनहोलची तपासणी करण्याची क्षमता आहे.
नालेसफाईसह पाणी साचू नये, यासाठी रुळांलगतच्या उपाययोजना जवळपास पूर्ण झाल्या आहेत. मान्सूनपूर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. कचरा न टाकण्यासाठी जनजागृतीही सुरू आहे.
- डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. स्थानिक महापालिकांसोबत समन्वय ठेवत पूरप्रवण भागांत वॉटर लेव्हल मॉनिटरिंग यंत्रे बसविली आहेत. तुळशी, विहार, पवई नद्यांची तपासणीदेखील पूर्ण झाली आहे.
- विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे