मुंबई महापालिका डायरी; नालेसफाई की कोटींची हातसफाई?

By सीमा महांगडे | Updated: May 19, 2025 14:15 IST2025-05-19T14:15:34+5:302025-05-19T14:15:56+5:30

कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होतात. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. त्यामुळे नालेसफाई केली जाते की हातसफाई? असा प्रश्न मुंबईकरांनी विचारला तर प्रशासनाने त्याचे समाधानकारक उत्तर दिले पाहिजे. 

Drain cleaning or hand cleaning worth crores Mumbai Municipal Corporation Diary | मुंबई महापालिका डायरी; नालेसफाई की कोटींची हातसफाई?

मुंबई महापालिका डायरी; नालेसफाई की कोटींची हातसफाई?

सीमा महांगडे, प्रतिनिधी -

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतल्या छोट्या-मोठ्या नाल्यांतील गाळ उपसण्याचे काम सुरू होते. नाल्यातला १०० टक्के गाळ उपसायचा हे उद्दिष्ट ठेवून वजनानुसार गाळ बाजूला काढून ठेवला जातो आणि मग वर्षभर त्याच्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. ही मुंबईची नालेसफाई. वर्षभरातून एकदा होणारी प्रक्रिया आणि त्यामागचे अर्थकारण मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. २००५च्या महापुरानंतर नालेसफाईच्या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले आणि मग त्यासाठी पालिकेची तिजोरी ही ‘सैल’ होऊ लागली. सफाईच्या कंत्राटांसाठी दरवर्षी पालिकेचे शेकडो कोटी रुपये खर्ची पडतात. नालेसफाईतही मलिदा खाणारे बहाद्दर आहेतच. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होतात. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. त्यामुळे नालेसफाई केली जाते की हातसफाई? असा प्रश्न मुंबईकरांनी विचारला तर प्रशासनाने त्याचे समाधानकारक उत्तर दिले पाहिजे. 

मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे मिळून एकूण २८१ मोठे नाले आहेत. त्यापैकी २९ नाले शहरात, ११४ नाले पूर्व उपनगरांमध्ये, तर १३८ नाले पश्चिम उपनगरांमध्ये आहेत. शहरात १९.०७ किलोमीटरचे नाले आहेत. पूर्व उपनगरांमध्ये १०३.२६, तर पश्चिम उपनगरांमध्ये १४६.८० किलोमीटरचे नाले आहेत. मुंबईत २०२ लहान नाले आहेत. पूर्व उपनगरांमध्ये लहान नाल्यांची संख्या ९९४ आहे, तर पश्चिम उपनगरांमध्ये २९४ आहे.   

नालेसफाईसाठी पुढील दोन वर्षांसाठी जवळपास ५०० कोटी खर्च करण्यात येत आहेत. हा खर्च करदात्यांच्या दायित्वातून केला जातो. मात्र, तो कारणी लागत नाही, हे वास्तव आहे. २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षांत नाल्यांतील गाळ काढण्यासाठी महापालिकेने ९६२ कोटी रुपये खर्च केले आहेत. ३१ मेपर्यंत १०० टक्के नालेसफाई केली जाईल, असा दावा करणाऱ्या पालिकेला पुढच्या १४ दिवसांत ५० टक्के काम पूर्ण  करायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे ५० टक्के नालेसफाई होऊनही नाले कचऱ्याने तुडुंबच आहेत. 

महापालिका प्रामाणिकपणे नालेसफाई करत असेल तर मुंबईत थोड्याशाही पावसाने पाणी का तुंबते? असा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांना पडत नाही का? मात्र, भ्रष्टाचाराचा आड इतका भरला आहे की, पोहऱ्यात स्वच्छ पाणीच येत नाही. त्यामुळेच ही नालेसफाई की कंत्राटदारांची हातसफाई? अशी चर्चा दरवर्षी रंगते. नालेसफाईच्या चौकशीत पालिका अधिकारी आणि कंत्राटदार यांचे हात कसे बरबरटले आहेत, हे दाखवणारी काही माहिती पुढे आली. मात्र, यावरून धडा न घेता कंत्राटदार पुन्हा नालेसफाईच्या कामात चालढकल करीत आहेत. 

आपले कर्तव्य कधी बजावणार?
नालेसफाईसंदर्भात मुंबईकरही आपले जबाबदार नागरिकाचे कर्तव्य बजावताना दिसत नाहीत.  नाल्यात कचरा, प्लास्टिक, मोडक्या टेबल-खुर्च्या, सोफे यांसह विविध प्रकारच्या वस्तू फेकतात. नाल्यांत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. म्हणून फक्त निसर्गाला दोष देऊन जबाबदारी टाळता येणार नाही.  

Web Title: Drain cleaning or hand cleaning worth crores Mumbai Municipal Corporation Diary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.