एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. विलास नांदवडेकर रुजू
By सीमा महांगडे | Updated: October 1, 2022 22:36 IST2022-10-01T22:22:59+5:302022-10-01T22:36:41+5:30
प्रभारी कुलसचिव (अतिरिक्त प्रभार) म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. वंदना शर्मा यांच्याकडून त्यांनी चर्चगेट आवारात पदभार स्वीकारला. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. विलास नांदवडेकर रुजू
मुंबई : मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) कुलसचिवपदी डॉ.विलास दत्तू नांदवडेकर यांची नियुक्ती झाली असून १ ऑक्टोबरपासून डॉ. विलास नांदवडेकर कुलसचिव पदी रुजू झाले आहेत. प्रभारी कुलसचिव (अतिरिक्त प्रभार) म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. वंदना शर्मा यांच्याकडून त्यांनी चर्चगेट आवारात पदभार स्वीकारला. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
एसएनडीटी महिला विद्यापीठाचे नवीन कुलसचिव डॉ. नांदवडेकर हे यापूर्वी सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक, संचालक आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून ते कार्यरत होते. डॉ. नांदवडेकर हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी येथील असून त्यांनी पुण्याच्या सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संचालकपदी काम केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नोव्हेंबर २०१६ मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. नांदवडेकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी पाच वर्षे कामकाज केले. प्रशासकीय कामकाजाचा असलेला त्यांचा व्यापक अनुभव विद्यापीठाच्या विकासाकरिता लाभदायी ठरणारा असणार आहे.
आयसीटीचा अधिक वापर करण्यावर भर देणार -
शंभर वर्षाहून अधिक मोठी परंपरा, आशिया खंडातील पहिले महिला विद्यापीठ आणि सात राज्यात कार्यक्षेत्र असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलसचिवपदी काम करण्याची संधी मिळते हा माझ्या दृष्टीने आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली. शिवाजी विद्यापीठ व सिंहगड इन्स्टिट्यूट येथे केलेल्या कामाचा अनुभव मला एसएनडीटी साठी उपयुक्त ठरेल आणि सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केले जाईल अशा गवाही त्यांनी दिली. शिवाय विद्यापीठ हिताच्या वेगवेगळ्या योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न राहील तसेच विद्यापीठीय कामकाजात जास्तीत जास्त संगणकीय प्रणालीचा (आयसीटी) चा वापर करण्यावर भर देण्यात येईल व कामकाजात गतिमानता आणण्याचा कायम प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी म्हटले.