डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 19:10 IST2025-12-04T19:08:10+5:302025-12-04T19:10:00+5:30
CM Devendra Fadnavis News: या संदर्भात मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.

डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
CM Devendra Fadnavis News: डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीस पीडितेचे आई-वडील तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उपस्थित होत्या.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात गंभीर विसंगती असून, त्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले. तपासावर कोणताही दबाव नसल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले असून, कोणताही हस्तक्षेप सहन करणार नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, कुटुंबीयांनी मांडलेल्या मुद्द्यांनुसार ही आत्महत्या नसून खून असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. संबंधित प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम ८५ अंतर्गतही गुन्हा दाखल असून, छळ आणि मानसिक अत्याचाराचा स्पष्ट उल्लेख आहे. नीलम गोऱ्हे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर केले असून, तपासाची देखरेख एक महिला आयपीएस अधिकारी यांनी करावी, अशीही विनंती केली आली आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले की, डॉ. गौरीसारख्या सुशिक्षित, विद्वान मुलींचे अशाप्रकारे मृत्यू होणे ही केवळ व्यक्तिगत शोकांतिका नसून सामाजिक वेदना आहे. मी उपसभापती, स्त्री आधार केंद्राची अध्यक्षा आणि एक आई म्हणून अत्यंत संतप्त आहे. एक डिसेंबर रोजी त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती, त्यानंतर पुन्हा मुंबईत परतून त्यांनी याबाबत शासन पातळीवर पाठपुरावा केला.