Dr. Balbhimara Gore and Hastimal Hastie selected for the All India Lifetime Award | डॉ. बलभीमराज गोरे व हस्तीमल हस्ती यांची अखिल भारतीय जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड

डॉ. बलभीमराज गोरे व हस्तीमल हस्ती यांची अखिल भारतीय जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड

मुंबई -  महाराष्ट्र शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीच्या सन २०१८-१९ या वर्षाचे पुरस्कार आज घोषित करण्यात आले. हिंदी साहित्य अकादमीच्या पुरस्कारमध्ये सर्वोच्च समजले जाणारे अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार डॉ. बलभीमराज गोरे यांना आणि हस्तीमल हस्ती यांना घोषित झाला आहे. प्रत्येकी १ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

अकादमीतर्फे तीन प्रकारचे पुरस्कार दिले जातात. या वर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये २ अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, ८ राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, तसेच २१ विधा पुरस्कार अश्या एकूण ३१ पुरस्कारांचा समावेश आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांना अकादमीकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम दिली जाते. 'अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव' पुरस्कारासाठी रु. १ लाख, 'राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारासाठी रु. ५१,००० आणि विधा पुरस्कारासाठी स्वर्ण, रजत, कांस्य अश्या तीन प्रकारात अनुक्रमे रू, ३५,०००/-, रू. २५,०००/- आणि रू. ११,०००/- रोख देण्यात येतात.

यावर्षी 'अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव' पुरस्कारांमध्ये 'महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार' डॉ. बलभीमराज गोरे तसेच डॉ.'राममनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार' श्री. हस्तीमल हस्ती यांना प्रदान करण्यात येणार आहे.  'राज्य स्तरीय सम्मान जीवनगौरव पुरस्कार'पुरस्कारांतर्गत 'छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकता पुरस्कार'  संजय रघुराज तिवारी, 'साने गुरूजी राष्ट्रीय एकता पुरस्कार' साँवरमल सांगानेरिया,'पद्मश्री अनंत गोपाल शेवडे हिंदी सेवा पुरस्कार' डॉ. करूणाशंकर उपाध्याय, 'डॉ उषा मेहता हिंदी सेवा पुरस्कार' श्रीमती कमलेश बक्षी, 'गजानन माधव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक पुरस्कार' डॉ. सुभाष गोविंद महाले, 'कांतीलाल जोशी इतर हिंदी भाषी हिंदी लेखक पुरस्कार'  वीरेन्द्र याग्निक, 'व्ही शांताराम ललित कला हिंदी विशिष्ट सेवा पुरस्कार'  योगेश गौड़, 'सुब्रमण्य भारती हिंदी सेतू विशिष्ट सेवा पुरस्कार' शेखर सेन यांना प्रदान करण्यात येणार आहे. 'विधा' पुरस्कारांतर्गत 'काव्य' या विधासाठी देण्यात येणारा 'संत नामदेव पुरस्कार' कृपाशंकर मिश्र यांना स्वर्ण, संजय रमाशंकर शर्मा (संजय अमान) आणि  नरसिंह बहादुर सिंह (नादान) - (संयुक्त)  यांना रजत तसेच मंजू तिवारी यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 'कहानी' या विधासाठी देण्यात येणारा 'मुंशी प्रेमचंद पुरस्कार'  जितेन्द्र भाटिया यांना स्वर्ण, ममता सिंह यांना रजत, तसेच श्रीगुरूप्रताप शर्मा (आग) यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 'निबंध' या विधासाठी देण्यात येणारा 'आचार्य रामचंद्र शुक्ल पुरस्कार' श्री. संजीव निगम यांना स्वर्ण, तसेच अलका रागिनी यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 'समीक्षा' या विधासाठी देण्यात येणारा 'आचार्य नंददुलारे वाजपेयी पुरस्कार' डॉ. सत्यवती चौबे यांना स्वर्ण, डॉ. सतीश यादव यांना रजत, तसेच डॉ. सुधीर वाघ यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 'अनुवाद' या विधासाठी देण्यात येणारा 'मामा वरेरकर पुरस्कार' रविंद्र देवघरे (शलभ) यांना स्वर्ण व भगवान वैद्य प्रखर यांना रजत तसेच सेवक नैयर यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 'वैज्ञानिक तकनीकी' या विधासाठी देण्यात येणारा 'होमी जहांगीर भाभा कांस्य पुरस्कार'  वामनराव राघोबाजी गाणार यांना देण्यात येणार आहे. 'नाटक' या विधासाठी देण्यात येणारा 'विष्णुदास भावे पुरस्कार' सलिल चंद्र मिश्र (सलिल सुधाकर) यांना स्वर्ण तसेच विनोद नायक यांना कांस्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 'जीवनी-परक साहित्य' या विधासाठी देण्यात येणारा 'काका कालेलकर रजत पुरस्कार' डॉ. रमेश मिलन यांना देण्यात येणार आहे. 'पत्रकारिता-कला' या विधासाठी देण्यात येणारा 'बाबुराव विष्णु पराडकर स्वर्ण पुरस्कार' महेन्द्र मोदी यांना देण्यात येणार आहे. 'लोकसाहित्य' या विधासाठी देण्यात येणारा 'फणीश्वरनाथ रेणू कांस्य पुरस्कार' श्यामलता गुप्ता यांना देण्यात येणार आहे. 'बालसाहित्य' या विधासाठी देण्यात येणारा 'सोहनलाल व्दिवेदी रजत पुरस्कार' डॉ. प्रमोद शुक्ल यांना देण्यात येणार आहे.

 महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे यासाठीचा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार ३१ ऑगस्ट, २०१९ रोजी सायं. ६.०० वाजता रमेश पामा थडवानी सभागृह, जयहिंद महाविद्यालय, ए रोड, चर्चगेट, मुंबई  येथे आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषा व साहित्याच्या ‍ विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.

Web Title: Dr. Balbhimara Gore and Hastimal Hastie selected for the All India Lifetime Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.