Join us  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम रद्द; निमंत्रणाच्या वादावरुन झाला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 2:34 PM

या पायाभरणी कार्यक्रमासाठी १६ जणांना बोलवण्यात आले होते, त्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील कोणालाही आमंत्रित न केल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

मुंबई – बहुचर्चित इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेच्या वादावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आंबेडकर चळवळीतील नेत्यांना कार्यक्रमाचं आमंत्रण न दिल्याने वाद निर्माण झाला होता. आज दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम इंदू मिल येथे होणार होता.

रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी निमंत्रण न दिल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज सकाळी १० वाजता आनंदराज आंबेडकर यांना एमएमआरडीए निमंत्रण दिलं. इंदू मिलच्या आंदोलनपासून प्रत्येक कार्यक्रमात आमचा सहभाग होता. त्यानंतर या स्मारकातील निकृष्ट बांधकामाबाबत आवाज उठवला होता, त्यामुळे निमंत्रण देण्यात आलं नाही, या संपूर्ण कामाची गुणवत्ता सरकारने तपासावी असं आनंदराज आंबेडकरांनी मागणी केली आहे.

या पायाभरणी कार्यक्रमासाठी १६ जणांना बोलवण्यात आले होते, त्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील कोणालाही आमंत्रित न केल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. इतकचं नाही तर राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नव्हतं. तर कोणाला बोलवायचं हा सर्वस्वी निर्णय सरकारचा असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

मुंबई येथील इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमाला केवळ १६ जणांनाच आमंत्रण दिले गेले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी हे उपस्थित राहणार होते.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, स्मारक पुतळा पायाभरणी कार्यक्रमाचे अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. मात्र कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझी उद्धव ठाकरेंना विनंती आहे की त्यांनी अटलबिहारी वाजपेयींची इंदू मिलच्या जागेबाबत जी नोट आहे तिचे प्रथम अध्ययन करावे. तसेच वाजपेयींना नेमके काय अपेक्षित होतं ते ठाकरेंनी बघावे आणि त्यासाठी पुढाकार घ्यावा. स्मारकाच्या आराखड्याबाबत सुरूवातीपासूनच माझा आक्षेप आहे. तरीही मला कोणावर ही आरोप करायचे नाहीत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला अशा कार्यक्रमांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. इंदू मिल येथील स्मारकाला माझा विरोध कायम आहे अन् हे मी तिथे जाऊन बोलेल असेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :उद्धव ठाकरेडॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रकाश आंबेडकर