Join us  

कोरोनाची लशीबाबत लोकांच्या मनात साशंकता   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 5:47 PM

Corona Vaccine : लस टोचून घेण्याची घाई करणार नाही

देशातील ६१ टक्के लोकांचे मत

मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करणारी लस कधी येणार याकडे सा-या जगाचे लक्ष लागले असले तरी ही लस उपलब्ध झाल्यानंतर ती टोचून घेण्यासाठी घाईगडबड करणार नसल्याचे मत ६१ टक्के लोकांनी मांडले आहे. तातडीने ही लस घ्यावी की नाही याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. कोरोनाचे प्रतिबंध अनेकांच्या अंगवळणी पडले असून मार्च, २०२१ पर्यंत त्या निर्बंधांसह जीवन जगू शकतो असे ६३ टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर, हे निर्बंध असह्य झाले असून त्यामुळे प्रचंड निराश आणि अस्वस्थ असल्याची भावना ३३ टक्के लोकांनी व्यक्त केली आहे.

भारतासह जगभरात कोरोनाला रोखणा-या लस निर्मितीचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू आहेत. या प्रयत्नांच्या चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत या पैकी काही चाचण्या अंतिम टप्प्यात यशस्वी ठरतील असा अंदाज आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ती टप्प्याटप्प्याने कशी देता येईल याबाबतचे नियोजन केंद्र सराकारनेसुध्दा सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आँनलाईन सर्वेक्षण करणा-या लोकल सर्कल या संस्थेने देशातील २५ हजार नागरिकांची मते आजमावली. त्यातून हा निष्कर्ष समोर आला आहे. लस घेऊनच कोरोना पूर्व काळासारखे जीवन जगता येईल असे १२ टक्के लोकांना वाटत असून लस घेतल्यानंतरही काही महिने निर्बधांसह जगणे पसंत करू असे मत २५ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे.    

कोरोना काळातील निर्बंध आता मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. गेल्या आठ महिन्यांतील असंख्य निर्बंधांसह जगलेल्या लोकांचे मतही या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आले. या कालावधीमुळे आपण काळजी आणि चिंताग्रस्त असल्याचे ३३ टक्के लोकांनी सांगितले आहे. शांत आणि समाधानी असल्याचे १९ टक्के लोकांचे मत असून १३ टक्के जनता ही निराश आणि उदास असल्याचे हा अहवाल सांगते. २० टक्के लोक या कालावधीबाबत टीकात्मक सुर आळवलेला नाही. १० टक्के लोकांना आपले मत व्यक्त करता आलेले नाही.

कोरोनाच्या निर्बंधांचे पालन कधीपर्यंत ?

जोपर्यंत निर्बंध असतील तोपर्यंत – ३८ %

निर्बंधांना कंटाळलोय – २३

३१ डिसेंबर, २०२० पर्यंत - १४

३१ मार्च, २०२१ पर्यंत  - १४

३० जून, २०२१ पर्यत – ६

३१ सप्टेंबर २०२१ पर्यंत – ३

३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत - २ 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉक