Join us  

'तुला लाज नाही का वाटत', महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सुप्रिया सुळेंचं अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 4:28 PM

हिंगणघाटची घटना अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारी अशी घटना आहे

मुंबई : हिंगणघाट प्रकरणातील पीडितेचा आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला. पीडितेनं गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, ऑरेंज सिटी रुग्णालयात आज तिने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर राजकीय नेत्यांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडितेचा मृत्यू नसून खून असल्याची जळजळीत प्रतिक्रिया दिली. तसेच, छेडछाडमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी पुन्हा महाराष्ट्र सरकारला एका कार्यक्रम राबविण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. 

हिंगणघाटची घटना अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारी अशी घटना आहे. हा मृत्यू नसून खून झालेला आहे, असं मला आता वाटते. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा गृहमंत्र्यांनी केलेला उल्लेख कृतीत येण्याची अत्यंत तातडीची गरज आहे, अशा भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या. कुठलीही व्यक्ती असल्यास त्याच्याविरोधात अशी घटना घडल्यास त्याला तातडीनं न्याय मिळेल, असा मेसेज राज्यात गेला पाहिजे. कायद्याचा धाक बसणं अतिशय गरजेचं आहे. तिच्या आईवडिलांच्या भावनांचा विचारही करू शकत नाही. ते कोणत्या भयानक परिस्थितीतून जात असतील. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला गेला आहे. आधार म्हणून त्यांच्यासोबत उभं राहणं ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

''सकाळ उजाडली तीच हिंगणघाट पिडितेच्या मृत्युच्या दुःखद बातमीने. ही घटना घडल्यापासून मी अस्वस्थ होते. कालपरवाच जालना येथेही एका मुलीचा विनयभंग करुन तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. आपल्या नव्या पिढीला काय झालंय? समाजातील काही असंवेदनशील लोक अशी कृत्ये करतात, हे थांबलं पाहिजे, त्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. तसेच, 'तुला लाज वाटत नाही का?' (Shame on you ) हे छेडछाडीच्या विरोधातील एक कॅम्पेन आपण सुरु करतोय. छेडछाड करणाऱ्यांना आपली स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. आपण सर्वजण मिळून हे कॅम्पेन यशस्वी करू. हा राजकीय नसून सामाजिक प्रश्न आहे, आपण सर्वजण मिळून यावर तोडगा काढू,'' असे म्हणत अशा घटना घडतील तिथं आणि संबंधित आरोपींना आपण शेम ऑन यू.. तुला लाज नाही का वाटत? असा प्रश्न आजपासून विचारूया असे आवाहन सुप्रिया सुळेंनी केलंय.

टॅग्स :सुप्रिया सुळेगुन्हेगारीहिंगणघाटबलात्कारराष्ट्रवादी काँग्रेस