Join us

जागतिक वारसा असलेल्या स्थळी बाळासाहेबांचा पुतळा नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 02:27 IST

पुनर्विचार करण्याची मागणी : मुख्यमंत्री ठाकरे यांना फोर्ट येथील संघटनांनी घातले साकडे

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा दक्षिण मुंबईत पुतळा प्रस्तावित आहे. मात्र दक्षिण मुंबईतील जागतिक वारसा असलेल्या या ठिकाणी बाळसाहेबांचा पुतळा उभारण्यात येऊ नये, असे साकडे दक्षिण मुंबईतील काही संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे घातले आहे. येथे पुतळा उभारल्यास येथील वाहतूक नियमनात अडथळे येतील, असे या संघटनांचे म्हणणे असून, यासाठी पर्यायी जागा शोधावी. पर्यायी जागा मिळत नसेल तर पुतळ्याच्या उंचीबाबत पुनर्विचार करावा, अशी त्यांची मागणी आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) समोर प्रस्तावित असून, त्यांच्या शिवाजी पार्क येथील स्मारकावरून वाद निर्माण झाले होते. फेडरेशन आॅफ रेसिडेंट ट्रस्ट्स (फोर्ट) या संघटनेने यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. या शिखर संघटनेत ओव्हल कुपरेज रेसिडेंट असोसिएशन (ओसीआरए), नरिमन पॉइंट चर्चगेट सिटीझन असोसिएशन (एनपीसीसीए) आणि ओव्हल ट्रस्टचा समावेश आहे. पत्रानुसार, दक्षिण मुंबईत जेथे बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार आहे; ते ठिकाण युनेस्को जागतिक वारशांच्या यादीत येते. परिणामी मुख्यमंत्र्यांनी पुतळ्यासाठी पर्यायी जागा शोधावी, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, येथूनच गेट वे आॅफ इंडियाकडे मार्ग जात असून, येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या कारणाने येथे पुतळा उभारण्यात येऊ नये, असेही पत्रात नमूद आहे. पुतळ्याची जागा, उंची आणि यामुळे वाहतुकीच्या नियमनावर लक्ष ठेवण्यास अडथळे येतील, असे संघटनेचे म्हणणे आहे.सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत काय ठरले?पूर्वनियोजित जागेत बदल करीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा आता महात्मा गांधी मार्गावरील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटावर बसवण्यात येणार आहे. महापौर दालनात १२ डिसेंबर रोजी झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा गेट वे आॅफ इंडियाजवळ, रिगल सिनेमासमोरील वाहतूक बेटाच्या ठिकाणी बसवण्यात यावा, अशी मागणी तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांनी केली होती. यास पालिका सभागृहाची मंजुरीही घेण्यात आली होती. तसेच वाहतूक पोलीस, पुरातन व अन्य सर्व प्रकारच्या परवानगी घेण्यात आल्या.च्मात्र नियोजित जागा अपुरी असल्याने त्यात बदल करण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मांडली. त्यानुसार आता हा पुतळा रिगल चित्रपटगृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी आॅफ मॉर्डन आटर््स (एनजीएमए) या इमारतीसमोर महात्मा गांधी रोड, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये बसविण्याची मागणी गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आली आहे.बाळासाहेबांचा पुतळा बनविला गेला आहे. चौकामध्ये ज्या ठिकाणी पुतळा बसविण्यात येणार आहे; त्यासाठीच्या परवानग्या ज्या ज्या प्राधिकरणांकडून घ्यायच्या आहेत, त्या परवानग्या रितसर घेतल्यानंतर संबंधित ठिकाणी पुतळा बसविला जाईल.- यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती, मुंबई महापालिका 

टॅग्स :मुंबईबाळासाहेब ठाकरे