Don't want the environment to be on the development agenda? | विकासाच्या अजेंड्यावर पर्यावरणाचा -हास नको?

विकासाच्या अजेंड्यावर पर्यावरणाचा -हास नको?

मेट्रोसाठी आरे कॉलनीत कारशेड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २ हजार २३८ झाडांची कत्तल केली जाणार आहे. या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणवादी संघटना, राजकीय पक्ष, पर्यावरणप्रेमी आणि मुंबईकरांनी आवाज उठविला आहे. मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीमध्ये वृक्षतोडीविरोधात आंदोलन, निदर्शने, मानवी साखळी इत्यादींमध्ये तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी असते. तरुणांना शहराच्या विकासाबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनही हवे आहे. आपण प्रगतीचे शिखर गाठता-गाठता पर्यावरणाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, याशिवाय विकासकामे करताना पर्यावरणाला धक्का बसणार नाही. याची सरकारने काळजी घेणे आवश्यक आहे, असे मत तरुणाईने व्यक्त केले आहे.
>निसर्गाचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. सद्यस्थितीत मानवी वृत्तीमुळे निसर्गाची हानी होताना दिसतेय. अशा परिस्थितीत सुधारणा करण्याऐवजी प्रश्न अधिक गंभीर होताना दिसतोय. अलीकडे आरे कॉलनीतील मूळ जंगल नष्ट करून, त्यावर मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जर झाडे तोडून आपण आपल्या देशाचा विकास करतोय, तर हा विकास नसून अधोगती आहे. देशाचा विकास करताना प्रत्येक गोष्टीचा विचार करायला हवा. तिथे राहणाऱ्या लोकाचं काय? तेथील प्राणी कुठे जातील. त्यामुळे सरकारने प्रथम निसर्गाचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
- प्रीती मोहिते, डहाणूकर महाविद्यालय, विलेपार्ले.
>आरे वृक्षतोड हा सध्या वादाचा प्रश्न असला, तरी आपल्या विकासासाठी आपण कोणती पावले उचलत आहोत आणि त्याचा परिणाम सभोवतालच्या निसर्गावर काय होत आहे? हे पाहणं आवश्यक आहे. देशभरात प्रदूषणाचे प्रमाण वाढत असताना, झाडे ही लोकांसाठी पर्यावरण पूरक भूमिका पार पाडत आहेत, त्यामुळे वृक्षतोडीचा परिणाम हा सध्याच्या आणि भावी पिढीच्या आरोग्यावर होऊ शकतो. आरेमधील वनराई ही मुंबईची शुद्ध श्वास नलिका म्हणून ओळखली जाते; त्यामुळे आरोग्य आणि पर्यावरण हे समीकरण पाहून या विषयाकडे पाहायला हवे.
- श्रुती नाईक, रितुम्बरा महाविद्यालय, विलेपार्ले.
>आरे कॉलनीचा मुद्दा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सगळीकडे पर्यावरण की, विकास असे दोन प्रश्न निर्माण झाले आहेत. मला वाटते की, आपण पर्यावरणाकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. कारण पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपले कर्तव्य असून काळाची गरज आहे. केवळ विविध क्षेत्रात क्रांती करून चालणार नाही हेदेखील लक्षात घ्यायला हवे. यामुळे मानव जातीला धोका निर्माण होऊ शकतो. पर्यावरण सुरक्षित आहे, तर मानव सुरक्षित आहे. आरे कॉलनीमध्ये केवळ झाडे नसून प्राणी पक्षीही मोठ्या संख्येने राहतात. तेथे वृक्षतोड केल्यास पशु-पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येऊ शकतो.
- प्रथमेश जाधव, गोखले महाविद्यालय.
>नैसर्गिक साधनसंपत्ती ही आपली गरज आहे, त्याचा वापर करणे आवश्यक आहे, पण निसर्गाला हानी पोहोचणार नाही, याचे भान असणे ही संवेदना आपल्या मनात जागरूक व्हायला हवी. त्यात मुंबईसारख्या ठिकाणी कमी भूभागात जास्त लोकसंख्या असा प्रश्न आहे. आर्थिक राजधानी असल्या कारणास्तव येथे कारखाने त्यातील सांडपाणी दूषित वातावरण निर्माण करणारे वायू बाहेर पडतात. प्रदूषण मोठ्या प्रमाणात तयार होते. आपल्या भौगोलिकतेनुसार झाडेझुडपे चांगली निसर्गसंपत्ती आपल्याला लाभली आहे. आपण तिची जपवणूक करायला हवी, पण लोकसंख्या वाढीमुळे ते जपणे कठीण होत चालले आहे. आपण प्रगतीच्या मार्गावर जाता-जाता पर्यावरणाचा ºहास नाही करू शकत आणि केवळ प्रगतीचा विचार केला, तर माणसाचे जगणे अवघड आहे.
- पूजा गिºहे, नालंदा महाविद्यालय.
>सरकारने आरे कॉलनीतील वृक्षतोडीला अंतिम निर्णय दिला. सध्याच्या घडीला मेट्रो प्रकल्पाला विरोध नाही, पण यासाठी बळी जाणाºया झाडांचा प्रश्न आहे. मुंबईमधील प्रदूषण नियंत्रण करण्यामध्ये आरे कॉलनीचे सर्वात मोठे योगदान आहे. विकास किंवा मेट्रो यांच्या विरोधात आम्ही नाही, पण तिकडे राहणारे प्राणी कुठे जाणार सोबतच पर्यावरणाच्या नुकसानाच काय? मुंबईमधले प्रदूषण रोखणार कोण? हा मोठा प्रश्न आता आमच्यासमोर उभा राहिला आहे. १७ सप्टेंबर, २०१८ला सरकारने घोषणा केली, मुंबईतील तिवरांची जंगले कमी होत आहेत. त्याचं संरक्षण केलं पाहिजे. सरकारी पातळीवर तिवरांच्या झाडांची लागवड करण्याचा आदेश दिला होता. एका बाजूला तुम्ही सांगता झाडे लावा झाडे जगवा आणि दुसºया बाजूला तुम्ही सांगता आरे जंगलातील झाडे कापणार. हे असेच चालू राहिल, तर मुंबई २०२० साली देशातील सर्वात जास्त प्रदूषित शहर होईल. विकास तर हवाच आहे, परंतु या घडीला आम्हाला पर्यावरणसुद्धा हवे.
- आरती इंगळे, साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले.
>गेल्या काही दिवसांपासून आरेमधील वृक्षतोडावरचा मुद्दा गाजतो आहे. आरे येथील झाड ही एक नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. मुंबई शहराला मोठ्या प्रमाणात आॅक्सिजनचा पुरवठा या झाडांद्वारे होत असतो. मेट्रोमुळे मुंबईकरांचे जीवन सुखकर होईल, पण सुखकर जीवन जगण्यासाठी मनुष्याला आक्सिजनही तितकाच गरजेचा असतो. हा आॅक्सिजन आपल्याला पुरविण्याचे काम झाडे करत असतात. त्यामुळे झाडे नसतील, तर आॅक्सिजनच प्रमाण कमी होईल. आॅक्सिजन अभावी मनुष्याचे जीवन त्रासदायक बनून जाईल. एकीकडे विकास करायचा आणि एकीकडे विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करायची. अशा प्रकारचं धोरण सध्या सरकार राबवित आहे. त्यामुळे सरकारने आपलं धोरण बदलावं. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आरेच्या वृक्षतोडीला थांबविण्याचे प्रयत्न करायला हवेत.
- विनता सावंत, भवन्स कॉलेज, अंधेरी.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Don't want the environment to be on the development agenda?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.