"उद्याचे सूर्यग्रहण चुकवू नका; पण त्यामुळे कोरोना मरणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:33 AM2020-06-20T04:33:03+5:302020-06-20T06:50:07+5:30

शास्त्रज्ञांची माहिती; ग्रहणादरम्यान खाणे, पिणे, आंघोळ करणे, बाहेर जाण्यास हरकत नाही

Dont miss tomorrows solar eclipse But that won't kill Coronavirus says scientist | "उद्याचे सूर्यग्रहण चुकवू नका; पण त्यामुळे कोरोना मरणार नाही"

"उद्याचे सूर्यग्रहण चुकवू नका; पण त्यामुळे कोरोना मरणार नाही"

Next

मुंबई : उन्हाळ्यात खूप उन्हामुळे कोरोना मरेल. खूप पाऊस पडल्याने तो पावसात धुवून जाईल; अशा आशायाच्या संदेशांनी समाज माध्यमांवर धूमाकूळ घातला असतानाच आता रविवारी होणाऱ्या सूर्यग्रहणामुळे कोरोना मरून जाईल, अशा आशायाचे संदेश समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. मात्र हा दावा शास्त्रज्ञांनी खोडून काढला आहे.

सूर्यबिंब आणि पृथ्वीवरील एखाद्या विशिष्ट स्थानावरील निरीक्षक यांच्यामध्ये काही काळापुरता जेव्हा चंद्र येतो तेव्हा त्याला सूर्यग्रहण असे म्हणतात. दरवर्षी २ ते ५ सूर्यग्रहणे पृथ्वीवर कुठे ना कुठे होतच असतात. त्यांचा पृथ्वीवरील सूक्ष्म जीवांवर काहीही परिणाम होत नाही, अशी माहिती आयएसआरसी (इंडियन सायंटिस्ट रिसपॉन्स टू कोविड १९)ने ‘लोकमत’ला दिली.

यंदाच्या वर्षातले पहिले सूर्यग्रहण रविवार, २१ जून रोजी सकाळी १०.२५ वाजल्यापासून भारताच्या उत्तरेकडील भागातून पाहता येईल. आर्यभट्ट खगोलशास्त्र संशोधन संस्थेने (एआरआयईएस), तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) या सरकारच्या स्वायत्त संस्थेतर्फे झूम, यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून सूर्यग्रहणाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे. हे सूर्यग्रहण आफ्रिका, आशिया व युरोपच्या काही भागांतून पाहता येईल. उत्तर भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहता येणार आहे. रविवारी सकाळी १०:२५ वाजता सुरु होणारे ग्रहण दुपारी १२:०८ वाजता पूर्णावस्थेत दिसेल; तर दुपारी ०१:५४ वाजता ग्रहण सुटेल.

दक्षिण भारतातून २६ डिसेंबर २०१९ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. देशातील विविध भागांमधून खंडग्रास ग्रहण दिसले होते. भारतात यापुढील कंकणाकृती सूर्यग्रहण पुढील दशकात म्हणजे २१ मे २०३१ रोजी तर खग्रास सूर्यग्रहण २० मार्च २०३४ रोजी दिसेल.

ग्रहण चष्मा वापरा
उघड्या डोळ्यांनी सूर्य थेट पाहू नका. डोळ्यांना इजा होऊ नये, म्हणून ग्रहण पाहण्याकरिता ग्रहण चष्मा (आयएसओ प्रमाणित) किंवा योग्य फिल्टरसह कॅमेरा वापरा.
ग्रहण पाहण्यासाठी एक्स-रे फिल्म किंवा सामान्य गॉगल (अतिनील संरक्षणासह), रंगीत काच वापरू नका.
पिनहोल कॅमेरा किंवा दुर्बिणीचा वापर करून पडद्यावरील प्रतिमा पाहणे, हा कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.
ग्रहण चालू असताना खाणे, पिणे, आंघोळ करणे, बाहेर जाण्यास काहीच हरकत नाही, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

Read in English

Web Title: Dont miss tomorrows solar eclipse But that won't kill Coronavirus says scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.