लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोकणातील प्रत्येक भागात भगवा फडकाविल्याशिवाय राहणार नाही. कोकण पादाक्रांत करणारच आहे. शेतकरी, कामगार, सामान्य माणूस आमची फसवणूक झाल्याचे सांगत आहे. तुम्ही इकडे या, अशी साद ते घालत आहेत. स्थानिक कुरघोड्या होत असल्या तरी घर सोडू नका. तुम्ही सांगाल, बोलवाल तिथे येणार. नाशिकचे शिबिर पार पाडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करणार आहे, असे आश्वासन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पक्ष कार्यकर्त्यांना दिले.
रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस नेते सहदेव पेटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उद्धवसेनेत प्रवेश केला. पेटकर यांना शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. शिवसेना नेते खा. संजय राऊत, खा. अरविंद सावंत, नेते विनायक राऊत यावेळी उपस्थित होते.
कार्यकर्ता पक्षासोबतचविधानसभा निवडणुकीतील निकाल अनपेक्षित होते. हे निकाल कसे लागले याच्या सुरस कथा आता बाहेर येत आहेत. शब्द पाळणारा पक्ष शिवसेना आहे म्हणून विश्वास ठेवून पक्षात अनेक जण येत आहेत. काही जण दुसरीकडे गेले; पण, त्यांना मोठे करणारा सामान्य कार्यकर्ता पक्षासोबत आहे, असे ठाकरे म्हणाले.
सहदेव श्रीकृष्णा जवळ सहदेव पेटकर स्वगृही परतले आहेत त्यामुळे कोकण आणि रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली. उद्धव म्हणजे श्रीकृष्ण, मी संजय आणि सहदेव. धर्मराजाच्या अत्यंत जवळचा सहदेव होता. पण, तो आता श्रीकृष्ण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या जवळ आला आहे, असे खा. संजय राऊत म्हणाले.