Join us

कोरोनाशी लढताना माणुसकी विसरू नका, प्रवेशबंदी लादणाऱ्या गावकीच्या भूमिकेवर नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 17:06 IST

एरवी सणावाराला चाकरमानी, नोकरदार वर्गाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या गावकीने आपल्याच माणसांना दूर लोटू नये. ती आपलीच माणसे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. जमावबंदी, संचारबंदीची अंमलबजावणी होतेय. मात्र, याचवेळी गावकीकडून जमावबंदी, शहरातून आलेल्यांविरोधात अप्रत्यक्ष बहिष्काराची नवी डोकेदुखी समोर आली आहे. ठिकठिकाणी गावकीने घेतलेल्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनासुद्धा माणसुकी जपण्याचे आवाहन करावे लागले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरे, मोठी शहरे आणि तालुक्याच्या ठिकाणावरून चाकरमानी, नोकरदार वर्गाने आपापल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, गावची वाट धरणाऱ्या या लोकांना स्थानिक ग्रामस्थांकडून विरोध होत आहे. गावकरी बाहेर आलेल्यांकडे संशयाने पाहिले जात आहे. अनेक गावांनी सीमाबंदी केलेली आहे. एरवी गणपती, दिवाळी आणि शिमग्याला चाकरमान्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कोकणातही अघोषित प्रवेशबंदी केली गेली आहे. अगदी नवी मुंबई, पनवेल पासून कोकणातील काही गावांत शहरवासीयांना प्रवेश मनाई करण्यात आली आहे. अनेक गावांनी वेशीवर, प्रवेशद्वार आणि प्रवेशाच्या कमानीजवळच रस्त्यावर झाड्याच्या फांद्या, दगडे टाकून रस्ते बंद केले आहेत. शिवाय, परवानगीशिवाय प्रवेश न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यावर, लक्षणे आढळल्यास रूग्णालयात नेणे, हा उपाय आहे. प्रवेश देणार नाही, बाजूला टाकू अशी भूमिका घेता येणार, असे मंत्री टोपे यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही सावध आहे. बहिष्काराचे प्रकार सुरू होऊ नयेत यासाठी वारंवर माणुसकी जपण्याचे आवाहन केले जात आहे. मंगळवारी आरोग्य मंत्री टोपे यांनी पुन्हा एकदा जनतेला माणुसकी जपण्याचे आवाहन केले. आपले राज्य सुसंस्कृत राज्य आहे. गावात आलेल्या नागरिकांशी माणुसकीचे वर्तन ठेवा. गावात येणारे लोकही आपलेच आहेत. ते काही कोरोनाग्रस्त देशांतून आले नाहीत, असे आवाहन टोपे यांनी केले आहे. 

यापूर्वी मुंबईतील काही सोसायट्यांमध्येही बहिष्काराचे प्रकार समोर आले. तेंव्हाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्र्यांनी अशा प्रकारांना विरोध केला होता. कोरोनाशी लढताना संयम, जिद्द, एकमेकांना सहकार्य आणि माणुसकी राखण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याराजेश टोपे