कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
By यदू जोशी | Updated: July 4, 2025 10:17 IST2025-07-04T10:16:32+5:302025-07-04T10:17:51+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्याच आहेत. बहुतेक ठिकाणी महायुती होईल. अपवादात्मक परिस्थितीत अडचणी येतील, त्या सोडविण्याचा प्रयत्न असेल.

कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
यदु जोशी
मुंबई : कॉन्ट्रॅक्ट, टेंडरच्या मागे लागू नका, मतदारसंघाच्या व्यापक हिताचा विचार करून कामे करा. आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा आहे, त्यानुसार पुढे जा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना दिला आहे.
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
फडणवीस यांनी भाजप आमदारांना बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन दिले. यावेळी त्यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. विकासाची कामे करताना मतदारसंघाचे कशात भले आहे, त्याचा विचार करूनच कामे केली पाहिजेत. आमदार निधीचा योग्य वापर करा. राज्यासमोर आर्थिक अडचणी काही महिने नक्कीच आहेत पण त्याचा फटका विकासकामांना बसणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्याच आहेत. बहुतेक ठिकाणी महायुती होईल. अपवादात्मक परिस्थितीत अडचणी येतील, त्या सोडविण्याचा प्रयत्न असेल. तुम्ही मात्र महायुती म्हणूनच आपण निवडणुकांना सामोरे जाणार आहोत हे गृहित धरून कामाला लागा, असेही ते म्हणाल्याचे कळते.
‘सोशल मीडियावर व्यक्त व्हा’
केंद्र आणि राज्य सरकारचे निर्णय, भाजपची कामगिरी लोकांपर्यंत कशी पोहोचेल यासाठी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे उपयोग करा असा सल्ला देताना त्यांनी स्वत:सह चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांची उदाहरणे दिली. कोणकोणते आमदार सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मचा किती वापर करतात याचा चार्ट आमदारांना दाखविला.
नरेटिव्ह तयार करा
लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या फेक नरेटिव्हचा फटका बसला होता. विधानसभेत आपण आक्रमक होऊन ते हाणून पाडले. यावेळी पुन्हा आपल्याविरोधात फेक नरेटिव्ह तयार करण्याचे चालले आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर प्रत्येक आमदाराने दिले पाहिजे. त्यांनी फेक नरेटिव्ह तयार करायच्या आधीच सरकारच्या, पक्षाच्या बाजूने नरेटिव्ह आपल्याला तयार करता आले पाहिजेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘याला-त्याला घेऊ नका, अशी भूमिका नको’
भाजपमध्ये बाहेरच्या पक्षातील लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत. पक्ष मजबूत होण्याच्या दृष्टीने त्याचा फायदाच होणार आहे. त्याला विरोध करण्याची भूमिका घेऊ नका. मतदारसंघासाठी तुमचा आणि पक्षसंघटनेचा शब्दच अंतिम असेल.
जे बाहेरून येत आहेत ते सहकार्य करतील याची काळजी आम्ही घेऊ, नाशिक आणि अन्य काही ठिकाणी इतर पक्षातून नेत्यांना घेण्यास विरोध करण्यात आला होता ही पार्श्वभूमी मुख्यमंत्र्यांच्या या विधानामागे होती.