Join us

रक्तदान करा... टाटा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 09:46 IST

blood donation : टाटा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्तसाठा कमी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे टाटा मेमेरियलने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत रक्तसाठा उपलब्ध करणे, हे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर वेळोवेळी असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाकडूनही रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन करण्यात येते. यातच आता परळच्या टाटा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्तसाठा कमी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे टाटा मेमेरियलने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

टाटा मेमोरियलने यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, टाटा मेमेरियलमध्ये आम्हाला रक्ताच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. कृपया, रक्तदान करण्यासाठी पुढे या, रक्तदान पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तुम्ही जीव वाचवाल. जर तुम्हाला रक्तदान करण्यासाठी यावे, असे वाटल्यास तुम्ही आमच्या रक्तपेढीशी 022-24177000 या नंबरवर संपर्क साधा.

दरम्यान, रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांसह थॅलेसिमिया, रक्तक्षय, हेमोफिलिया, प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव अशा रुग्णांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते; परंतु मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी राज्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन करण्यात येते.

व्हॉट्सअप ग्रुपमधून समजतेय रक्ताची उपलब्धतालॉकडाऊनच्या कालावधीत रक्तदात्यांना शिबिराच्या ठिकाणी येण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी पोलीस व जिल्हाधिकारी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार व्हॉटसअप ग्रुपवर रक्तपेढीकडून अद्ययावत माहिती उपलब्ध होत आहे. रक्ताचा तुटवडा होऊ नये, यासाठी गरजेनुसार रक्तदान शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना सरकारकडून दिल्या आहेत.

टॅग्स :रक्तपेढीटाटा