Join us

पगाराचे चार हजार रुपये कमी दिले म्हणून पळवले दुसऱ्याचेच श्वान; विलेर्पालेतील विचित्र प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:55 IST

विलेपार्लेत पैशांच्या वादातून श्वानाला पळवले; उच्चभ्रू इमारतीच्या पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई: सहकाऱ्यांशी झालेल्या पैशाच्या वादात इमारतीमधील सोसायटीतील एका रहिवाशाच्या श्वानाला फिरवून आणण्याच्या बहाण्याने पळवून नेल्याची तक्रार जुहू पोलिसांत दाखल झाली आहे. त्याआधारे पोलिसांनी पर्यवेक्षक राजेंद्र पांढरकर (३०) याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

विलेपार्ले पश्चिमेकडील एनएस रोड क्रमांक ६ येथील उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या व्यावसायिक आदिती जोशी यांच्याकडे पोमेरेनियन जातीचा श्वान होता. त्याचे नाव प्रिक्सी आहे. त्यांच्या सोसायटीला आर कॉप कंपनीची सिक्युरिटी आहे.

या सोसायटीतील सदस्यांच्या पाळीव श्वानांना पर्यवेक्षक फिरवण्यासाठी घेऊन जातील, असे सुरक्षा एजन्सीचा मालक सुनील शुक्ला आणि राउंडर विशाल मालुसरे यांच्याशी झालेल्या तोंडी चर्चेत ठरल्याचे जोशी यांचे म्हणणे आहे.

बिल्डिंगचा बाउन्सर राहुल दास (२५) याने १५ एप्रिल रोजी जोशी यांचा श्वान प्रिक्सी याला घरातून घेत सुरक्षारक्षक राजीव यादव (२१) याच्याकरवी पांढरकर याच्या ताब्यात दिले. त्याला तो फिरायला घेऊन गेला; मात्र अद्याप परतलेला नाही, असे जोशी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल बंद

जोशी यांनी पांढरकर याच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता तो बंद होता. याबाबत जोशी यांनी राउंडर मालुसरे याला विचारणा केल्यावर पैशावरून पांढरकरचा माझ्याशी वाद झाला होता, असे त्याने सांगितले. या वादातूनच पांढरकर याने आमचा श्वान नेला, असे जोशी यांचे म्हणणे आहे. अंदाजे १० हजार रुपये किमतीच्या या श्वानाच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी पांढरकरवर गुन्हा नोंदवला आहे.

'२५ हजार द्या, श्वान न्या'

मालुसरे यांनी पगारातील चार हजार रुपये कमी दिल्यामुळे पांढरकरने प्रिक्सीचे अपहरण केल्याची माहिती आहे.

मात्र, आता त्याने मालुसरे यांना माझ्या बँक खात्यात महिन्याचा पूर्ण पगार म्हणजे २५ हजार रुपये पाठव आणि प्रिक्सीला ताब्यात घे, अशा आशयाचा मेसेजही पाठविला आहे.

दुसरीकडे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पांढरकर प्रिक्सीला घेऊन रिक्षात बसून जात असल्याचे दिसत आहे. तसेच त्याचे शेवटचे लोकेशन अहमदनगर असल्याचे समजते. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस