मुंबई: परिमंडळ ११ मध्ये मोडणाऱ्या एमएचबी कॉलनी पोलिसांच्या हद्दीत श्वान अंगावर भुंकला म्हणुन मोलकरणीने त्याच्यासह त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाला लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात घडला. याविरोधात त्यांच्या मुलीने पोलिसात धाव घेतल्यानंतर पोलिसांनीही निव्वळ एनसी दाखल केल्याने याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे.शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास दहिसर पश्चिमच्या लिंक व्ह्यू इमारतीमध्ये हा प्रकार घडला. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवलीच्या आय सी कॉलनीत लिंक व्ह्यू इमारतीत ६०२ क्रमांकाच्या खोलीत डॉमनिक फर्नांडिस (७९) त्यांच्या पत्नीसोबत राहतात. ते प्राणिप्रेमी असल्याने एका भटक्या श्वानाची सेवा सुश्रुषा ते गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेतत. शुक्रवारी सकाळी आठ वाजता या इमारतीत घरकाम करणारी मोलकरीण कामासाठी आली तेव्हा मंगला हिच्यावर तो श्वान भुंकला. त्यामुळे डॉमनीक यांनी दरवाजा उघडला. तेव्हा मंगला त्यांना शिवीगाळ करत 'तुमच्या कुत्र्याला आत बांधून ठेवा' असे तिने डॉमनिक यांना सांगितले. ते पाहून कुत्रा तिच्या अंगावर भुंकू लागला. तेव्हा शेजारी झाडाच्या आधाराला लावलेली काठी तिने काढली आणि श्वानावर सपासप मारण्यास सुरवात केली. तेव्हा डॉमनिक हे त्या श्वानाला वाचवण्यासाठी धावले. मात्र मंगलाने त्यांचीही गय न करता त्यांच्यावरही हल्ला चढविला. ज्यात त्यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी त्यांची मुलगी कालियाना डॉमनिक फर्नाडिस (४८) यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी याप्रकरणी निव्वळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.हल्लेखोर महिलेला अटक करा'मोलकरणीच्या हल्ल्यात माझ्या वडिलांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच श्वानालाही मानसिक धक्का बसला असुन त्याने अन्नपाणी सोडून दिले आहे. त्यामुळे सदर हल्लेखोर महिलेवर गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात यावी अशी माझी मागणी आहे.( कालियाना फर्नांडिस - जखमी डॉमनिक यांची मुलगी )
श्वान भुंकला म्हणून मोलकरणीनं वृद्धासह मुक्या जनावराला काठीनं चोपलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 12:40 IST