कोविड लस पुरवठादारांच्या कागदपत्रांची आता छाननी; जागतिक स्तरावरील नऊ पुरवठादार स्पर्धेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 23:06 IST2021-06-01T23:06:02+5:302021-06-01T23:06:49+5:30
Coronavirus Vaccine : येत्या दोन तीन दिवसांत होणार छाननी. नंतर होणार १ कोटी लस खरेदीचा निर्णय

कोविड लस पुरवठादारांच्या कागदपत्रांची आता छाननी; जागतिक स्तरावरील नऊ पुरवठादार स्पर्धेत
मुंबई - लस खरेदीसाठी महापालिकेने जागतिक स्तरावर मागविलेल्या स्वारस्य अभिव्यक्तीस एकूण दहा पुरवठादारांनी प्रतिसाद दिला होता. यापैकी एका पुरवठादारांनी माघार घेतल्यानंतर सध्या नऊ पुरवठादार स्पर्धेत आहेत. मंगळवारी निविदेची मुदत संपल्यामुळे सर्व पुरवठादारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी पालिका प्रशासन येत्या दोन ते तीन दिवसांत करणार आहे. त्यानंतरच एक कोटी लस खरेदीबाबत निर्णय होणार आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेपूर्वी मुंबईतील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे. त्यानुसार १२ मे रोजी एक कोटी लस खरेदीसाठी जागतिक निविदा मागवण्यात आल्या. आतापर्यंत दोनवेळा मुदतवाढ देण्यात आल्यानंतर एकूण दहा पुरवठादार पुढे आले होते. मंगळवारी दुपारी १ वाजता या निविदेची मुदत संपली. यावेळी नऊ पुरवठादार स्पर्धेत शिल्लक आहेत.
या नऊ संभाव्य पुरवठादारांपैकी सात कंपन्यांनी स्पुतनिक फाईव्ह लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे. तर त्यातीलच एका पुरवठादाराने स्पुतनिक लाईट ही लस देण्याची तयारी दाखवली आहे. तर अन्य एका पुरवठादाराने मान्यता प्राप्त लसींपैकी जी प्राप्त होईल त्या लसीचा पुरवठा करण्याची हमी दिली आहे. त्यामुळे आता अंतिम मुदतीत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची प्रशासन पडताळणी करणार आहे.
तरच लस पुरवठ्याचे कंत्राट देणार...
लस पुरवठा दिलेल्या मुदतीत होईल याची खात्री करून घेणे, किती दिवसात व किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती याचा पालिका बारकाईने अभ्यास करीत आहे. निविदेची मुदत आता संपल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व पुरवठादारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची बारकाईने छाननी करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.