डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 08:06 IST2025-04-21T08:05:36+5:302025-04-21T08:06:06+5:30

विशालच्या मृत्यूस डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप करून कारवाई करावी, अशी मागणी त्याच्या वडिलांनी केली आहे.  

Doctor's negligence caused patient's death?; Nair Hospital denies all allegations | डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

मुंबई - पालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. यासंदर्भात आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मात्र, रुग्णालय प्रशासन अथवा डॉक्टरांकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही, सर्व तपासणी अथवा चौकशीसाठी रुग्णालय प्रशासन तयार असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले. 

या तरुणाचे नाव विशाल मगर (२५) असे आहे. तो दहिसरला राहत होता. त्याच्या वडिलांनी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. विशालच्या पोटात दुखू लागल्याने बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला कावीळ असल्याचे निदान केले. तसेच तेथील पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.  तेथील डॉक्टरांनी त्याच्या पित्ताशयात खडे झाल्याचे निदान केले. त्यानंतर १८ एप्रिलला पहाटे त्याला नायरमध्ये दाखल केले. तेथे डॉ. अनुराग जावडे आणि डॉ. मोहिनी यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू झाले.

दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करून त्याच्या पित्ताशयातील खडे काढण्यात आले. त्यानंतरही त्याच्या पोटात खूप दुखत होते. लघवी बाहेर काढण्यासाठी त्याला कॅथेटर लावण्यात आला होता; परंतु कॅथेटर व्यवस्थित न लावल्याने त्याची लघवी पास होत नव्हती. ही बाब मी तात्काळ वाॅर्ड ९ मधील नर्सच्या निदर्शनास आणली, तसेच डॉ. जावडे आणि डॉ. मोहिनी यांना फोनही केला; परंतु त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर पाहटे ५ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला, असे त्याच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. विशालच्या मृत्यूस डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप करून कारवाई करावी, अशी मागणी त्याच्या वडिलांनी केली आहे.  

मृत्यू काविळीने : अधिष्ठाता  
यासंदर्भात नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते म्हणाले, की या रुग्णाच्या पित्ताशयातील खडे काढण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या पित्ताशयाला सूज आल्याचे आमच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्याची कावीळ खूप वाढल्याने त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात डॉक्टरांनी कोणताही हलगर्जीपणा केलेला नाही. आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत.

Web Title: Doctor's negligence caused patient's death?; Nair Hospital denies all allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.