Join us  

...म्हणून वेदिका शिंदे हिचा मृत्यू झाला; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण, वडिलांनीही केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 5:35 PM

भोसरीतील वेदीकाचे वडील सौरव शिंदे, आई व आजोबांनी  उपचारासाठी १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन बाहेर देशातून मागवण्यासाठी मदतीचे आवाहन काही महिन्यांपूर्वी केले होते.  

मुंबई/ पुणे: स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी (SMA) आजाराशी लढणाऱ्या ११ महिन्यांच्या वेदिका शिंदेचं १ ऑगस्ट रोजी निधन झालं. दीड महिन्यांपूर्वीच वेदिकाला उपचारासाठी आवश्यक असलेलं १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आलं होतं. इंजेक्शन दिल्यानंतर तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत होती. परंतु रविवारी (१ ऑगस्ट) अचानक ऑक्सिजनची पातळी कमी झाली आणि तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं पण तिचा मृत्यू झाला.

भोसरीतील वेदीकाचे वडील सौरव शिंदे, आई व आजोबांनी  उपचारासाठी १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन बाहेर देशातून मागवण्यासाठी मदतीचे आवाहन काही महिन्यांपूर्वी केले होते. त्यांच्या आवाहनाला साद देत जनतेने भरभरून प्रतिसाद दिला व सर्वच थरातून तिला मदतीचा ओघ सुरू झाला. वेदीकासाठी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही तिची कस्टम ड्युटी माफ करण्यासाठी व मदतीसाठी लोकसभेत आवाज उठवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोदी सरकारला मदतीचे आवाहन केले होते. व त्या इंजेक्शनची कस्टम ड्युटी माफ करून घेतली. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. १६ कोटी लोकवर्गणीतून जमा झाली. इंजेक्शन भारतात आले. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर इंजेक्शन देऊन पुढील उपचार घेऊन वेदिका पूर्ण बरी होऊन घरी आली होती. सगळे व्यवस्थित  सुरू आहे असे वाटत असतानाच काळाने वेदीकवर झडप घातली. मात्र रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला अचानक श्वास घेण्यास त्रास झाला. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान तिने अखेरचा निरोप घेतला.

रविवारी संध्याकाळी वेदिकाला श्वसनाचा त्रास होऊ लागला. उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. छातीमध्ये दूध गेल्यामुळे वेदिकाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, मुलगी गेल्याचं दु:ख असतानाही वेदिकाच्या वडिलांनी सामाजिक बांधिकली जपल्याचं पाहायला मिळत आहे. वेदिकाचा मृत्यू इंजेक्शन दिल्यानंतरही कसा झाला, असा चुकीचा प्रश्न उपस्थित करु नका, असं आवाहन वेदिकाचे वडिल सौरव शिंदे यांनी केलं आहे. 

क्राऊड फंडींगच्या माध्यमातून उभारला होता पैसा-

सुरुवातीच्या टप्प्यापासून मिलापच्या ह्या फंडरेझर अभियानाला मीडियाने उचलून धरले व प्रसिद्धी दिली. पहिल्या आठवड्यामध्ये सुमारे १ कोटी इतका निधी उभा झाला. मिलापवर ह्याच हेतुसाठी सुमारे ५० अन्य मदत करणारे अभियानसुद्धा चालवले गेले. बरखा सिंह, मास्टर शेफ शिप्रा खन्ना असे सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्ती आणि अनुप्रिया खेर असे पालकांवर प्रभाव असलेले व्यक्ती आणि इतर अनेकांनी सहाय्य करून ह्या मोहिमेला बळकटी दिली. सोशल मीडीयावर आपल्या हँडल्स द्वारे आपल्या चाहत्यांना विनंती करून ह्यासाठी मदत करायला बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता जॉन अब्राहमही समोर आला होता. 

टॅग्स :मृत्यूडॉक्टरमुंबईपुणेवैद्यकीय