'कूपर'मध्ये डॉक्टरांना मारहाण; रुग्णालयात दिवसभर काम बंद, जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल; अत्यावश्यक विभागातील सेवा सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 10:35 IST2025-11-09T10:34:22+5:302025-11-09T10:35:06+5:30
Cooper Hospital News: महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयातील तीन डॉक्टरांना कर्तव्यावर असताना रुग्णाच्या नातेवाईकांकडून शनिवारी मध्यरात्री मारहाण करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टर आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांचा समावेश आहे.

'कूपर'मध्ये डॉक्टरांना मारहाण; रुग्णालयात दिवसभर काम बंद, जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल; अत्यावश्यक विभागातील सेवा सुरळीत
मुंबई - महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयातील तीन डॉक्टरांना कर्तव्यावर असताना रुग्णाच्या नातेवाईकांकडून शनिवारी मध्यरात्री मारहाण करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टर आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांचा समावेश आहे.
या प्रकरणी कुपर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांत तक्रार दिली असून, मारहाण करणाऱ्या संबंधित नातेवाईकांवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, मारहाणीच्या निषेधार्थ कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी शनिवारी दिवसभर कामबंद आंदोलन पुकारले. मात्र, अत्यावश्यक विभागातील सेवा सुरळीत सुरू होत्या.
अंधेरी येथील डीएन नगर परिसरात राहणाऱ्या समीर शेख यांची आई सईदा अब्दुल जब्बार शेख (वय ७२) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी तिला कूपर रुग्णालयात शनिवारी मध्यरात्री उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान आईचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर शाब्दिक चकमक होऊन नातेवाईकांनी डॉक्टरासोबत धक्काबुक्की करून त्यांना मारहाण केली. या सगळ्या प्रकारानंतर आरोग्य कमर्चारी आणि डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण होते.
या गंभीरप्रकरणी मुंबई वैद्यकीय महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या संचालिका डॉ. नीलिमा अंड्राडे यांनी सांगितले की, कूपरमधील डॉक्टर मारहाण घटनेची गंभीर दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. जुहू पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
डॉक्टरांच्या मागण्या अशा
अति तात्काळ विभागात आणि अशा महत्त्वाच्या विभागांमध्ये २४ तास प्रशिक्षित मार्शल / महाराष्ट्र सुरक्षा बल मधील सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.
निष्काळजी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबन व शिस्तभंगाची कारवाई करावी.
संवेदनशील विभागांमध्ये प्रशिक्षित, शस्त्रधारी आणि जबाबदार सुरक्षा रक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक करावी.
बहुस्तरीय सुरक्षा प्रणाली लागू करावी. नियंत्रित प्रवेशद्वार, पॅनिक अलार्म आणि तात्काळ प्रतिसाद पथके सुरू करावीत.
संपूर्ण सीसीटीव्ही कव्हरेज कार्यान्वित करून लाईव्ह मॉनिटरिंग व किमान ३० दिवसांची डेटा बॅकअप सुविधा उपलब्ध करावी.
रेसिडेंट डॉक्टरांच्या कामकाज व निवासाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करावी.
नियमित सुरक्षा ऑडिट आणि मार्ड प्रतिनिधींसोबत मासिक संयुक्त आढावा बैठक आयोजित करावी.
सोमवारी सायंकाळपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू. रुग्णालय परिसरातील सुरक्षा वाढवावी आणि अन्य मागणीचे पत्रक आम्ही काढले आहे. ते आम्ही प्रशासनाला दिले असून, सोमवार संध्याकाळपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास अन्य रुग्णालयातील निवासी डॉक्टरही कामबंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.
- डॉ. चिन्मय केळकर, महापालिका निवासी डॉक्टर संघटना
जुहू पोलिसांनी समीर शेखविरुद्ध महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन्स अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स अॅक्ट २०१० आणि भारतीय न्याय संहिताच्या कलम १२१ (१) (सरकारी सेवकाला कर्तव्यापासून रोखण्यासाठी दुखापत करणे), १३२ (सरकारी सेवकावर हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी), ३५२ (शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे आणि ३५१ (२) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.