मुंबई - भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. पदवी प्रदान सोहळा मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात मंगळवारी (२६ डिसेंबरला) पार पडला. कोयासीन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळणारे फडणवीस हे पहिले भारतीय ठरले आहेत. त्यामुळे, जागतिक देशपातळीवर फडणवीसांचा हा बहुमान झाल्याचं भाजपा समर्थकांकडून सांगण्यात येत असून त्यांचं अभिनंदनही केलं जात आहे. विशेष म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीस हे डॉक्टरेटसाठी योग्य व्यक्ती असल्याचं म्हटलं. मात्र, मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांना त्यांनी लक्ष्य केलं. त्यावर, भाजपाने पलटवार केला आहे.
कोयासन विद्यापीठाने १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी देण्याचा निर्णय घेतला. फडणवीस यांनी पायाभूत सुविधा, औद्याोगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. कोयासन विद्यापीठाचे प्रा. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुकाता यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावर बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, भावना गवळी यांना टोला लगावला.
महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री हेही डॉक्टर आहेत, अशा पद्धतीने. पण, देवेंद्र फडणवीस हे डॉक्टरकीसाठी योग्य आहेत. उद्या अजित पवारांना डॉक्टरेट दिली जाईल, हसन मुश्रिफांना डॉक्टर केलं जाईल. मग, भावना गवळींना डॉक्टर केलं जाईल. प्रफुल्ल पटेलांनाही डॉक्टर केलं जाईल, अशा पद्धतीने हे डॉक्टर मंत्रीमंडळ कॅबिनेट होऊन जाईल, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. मात्र, देवेंद्र फडणवीस हे डॉक्टरेट देण्यासाठी योग्य व्यक्ती आहेत, असेही राऊत यांनी म्हटले.
डॉक्टरेट देण्याची जी स्पर्धा लागलीय, त्यात उद्या डॉ. हसन मुश्रिफ होतील. आणखी होतील. पण, आम्हाला जर अशी डॉक्टरेट दिली तर आम्ही नाही म्हणू, आम्ही त्यासाठी योग्य नाहीत, असेही राऊत यांनी म्हटलं. संजय राऊत यांच्या या विधानावर भाजपाने पलटवार केला. भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विट करुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोज सकाळी टिव्हीवर फालतू बडबड करुन अथवा मराठी माणसाच्या घरांचे कटकमिशन खाऊन डॉक्टरेट मिळत नाही. नतद्रष्टासारखे "हग्रलेख" लिहून तर नाहीच नाही. नावापुढे "डॉ" लागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी गरीबांची सेवा, प्रचंड मेहनत, कष्ट, धाडस, धडाडी, निष्ठा, त्याग आणि संघर्ष करावा लागतो, असा टोला शेलार यांनी संजय राऊतांना लगावला आहे. तसेच, "डॉक्टर" या साडेतीन अक्षरांची किंमत तुम्ही नाही समजू शकणार श्रीमान संजयबाबू!, असा डायलॉगही त्यांनी मारला आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑगस्ट २०२३ मध्ये जपान दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात फडणवीस यांनी कोयासन विद्यापीठाला भेट दिली होती. तेव्हा डीन सोएदा सॅन यांनी फडणवीस यांना डॉक्टरेट देण्याचे जाहीर केले होते