पगारासाठी डॉक्टरलाच केले 'ब्लॅकमेल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 13:36 IST2026-01-14T13:36:03+5:302026-01-14T13:36:03+5:30
नायर रुग्णालयातील प्रकार; चौघा जणांविरोधात गुन्हा

पगारासाठी डॉक्टरलाच केले 'ब्लॅकमेल'
मुंबई : नायर रुग्णालयातील एका विभागाच्या प्रमुख डॉक्टरला एका महिलेचा विनयभंग केल्याचे सांगून, पोलिस कारवाईची भीती धमकावल्याचा धक्कादायक दाखवून प्रकार समोर आला आहे. आरोपींनी स्वतः पोलिस असल्याचे भासवून ही धमकी दिली असून, आग्रीपाडा पोलिसांनी चौघाजणांविरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारदार डॉक्टर यांना गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर आणि १० डिसेंबर रोजी मोबाइलवर पोलिस कॉन्स्टेबल म्हात्रे आणि किंगमेकर ग्रुपचे अध्यक्ष भैय्या गायकवाड असल्याचे भासवून त्यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दिल्याचे सांगून धमकी दिली. या प्रकरणी डॉक्टरांनी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत केलेल्या तपासात आरोपींचा बनाव उघड झाला. डॉक्टरांना २३ नोव्हेंबर रोजी आलेला कॉल साहिल वाघमोडे (वय २१) या नवी मुंबईतील तरुणाचा, तर १० डिसेंबर रोजी आलेला मोबाइल नंबर तुषार मुगदुम (२०) या तरुणाचा असल्याचे समोर आले. तक्रारदार डॉक्टर यांची पत्नी पनवेल येथे एक हॉस्पिटल चालवते. त्या ठिकाणी ऋषिकेश येवले (२६) हा फार्मासिस्ट म्हणून तर, अजय कदम (२२) हा एक्सरे टेक्निशिअन म्हणून काम करत होता.
पोलिस असल्याचे भासवत कारवाईची दिली धमकी
दोघांचेही सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यांचे पगार न झाल्यामुळे त्यांचे हॉस्पिटल मॅनेजमेंटसोबत बोलणे सुरू होते. ऋषिकेश येवले याने राजीनामा दिल्यामुळे त्याचा पूर्ण पगार देऊन त्याचा राजीनामा मंजूर करण्यात आला; परंतु, कदम याचा पगार झाला नव्हता. येवले, कदम, मुगदुम आणि वाघमोडे हे एकाच परिसरामध्ये राहत असून त्यांनी, २३ नोव्हेंबर रोजी वाघमोडे याच्या मोबाइलवरून तक्रारदार यांना पनवेल पोलिस ठाणे येथून पोलिस शिपाई म्हात्रे बोलत असल्याचे सांगून तक्रारदाराने हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेची छेडछाड केली आहे. ती महिला तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आली असून तुम्ही पनवेल पोलिस ठाणे येथे उपस्थित राहावे अन्यथा लोकेशन काढून कारवाई करू, अशी धमकी दिली.