Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैमानिक व्हायचंय का? मग सध्या खूप स्कोप आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 06:27 IST

गेल्या दोन महिन्यांत भारतीय नागरी हवाई क्षेत्रामध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना डिसेंबरमध्ये. ती अर्थात इंडिगो कंपनीची. डीजीसीएने वैमानिकांचे नवे वेळापत्रक जारी केल्यानंतर इंडिगोने पूर्वतयारी न केल्यामुळे देशातील विमानसेवा विस्कळीत झाली होती.

मनोज गडनीस

विशेष प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्यांत भारतीय नागरी हवाई क्षेत्रामध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना डिसेंबरमध्ये. ती अर्थात इंडिगो कंपनीची. डीजीसीएने वैमानिकांचे नवे वेळापत्रक जारी केल्यानंतर इंडिगोने पूर्वतयारी न केल्यामुळे देशातील विमानसेवा विस्कळीत झाली होती. सध्या भारतीय विमान क्षेत्रात इंडिगोचा मार्केट वाटा ६३ टक्के आहे. त्यामुळे नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी न केल्याने इंडिगोला डिसेंबरमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द कराव्या लागल्या आणि त्याचा फटका प्रवाशांना बसला. दुसरी घटना अशी की, त्याच इंडिगोने येत्या काळात एक हजार वैमानिकांच्या भरतीचा निर्णय जाहीर केला आहे. याचे मोठे पडसाद भारतीय विमान क्षेत्रामध्ये उमटणार आहेत.

विकसित भारत’चे ध्येय आता अगदी जवळ; पंतप्रधान मोदींनी सांगितला ३० वर्षांचा रोडमॅप

गेल्या दहा वर्षांत भारतात ७५ नवीन विमानतळांची निर्मिती झाली. भारतीय विमान कंपन्यांनी तिथे सेवा सुरू केल्यामुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. मात्र, प्रवासी संख्या जास्त आणि तुलनेने विमानांची संख्या कमी यामुळे मागणी-पुरवठ्याचे गणित फसले आहे. परिणामी, विशेषतः सुट्यांच्या हंगामात विमान प्रवासांचे दर हे गगनाला भिडतात. ज्या पद्धतीने देशात विमानतळांची आणि प्रवाशांची संख्या वाढत आहे ते पाहता ही परिस्थिती सुरळीत होण्यास किमान आठ वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

सध्या इंडिगो, एअर इंडिया, स्पाईसजेट, अकासा या विमान कंपन्यांच्या ताफ्यात मिळून अंदाजे ८०० विमाने आहेत. यापैकी जवळपास १५० विमाने तांत्रिक कारणांमुळे जमिनीवरच विसावली आहेत. मात्र, सर्व भारतीय प्रमुख कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नव्या विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे २०३० ते २०३३ या कालावधीत भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात आणखी किमान ३,००० विमाने दाखल होणार आहेत. त्यानंतरच परिस्थिती काही प्रमाणावर मार्गी लागू शकते. पण, आता इथे मुद्दा आहे तो वैमानिकांचा. वैमानिकांना नीट आराम मिळावा, याकरिता डीजीसीने जे नवे वेळापत्रक जारी केले आहे. त्यामुळे देशातील सर्व प्रमुख विमान कंपन्यांना आपल्या ताफ्यातील वैमानिकांची संख्या वाढवावी लागणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार सध्या भारतामध्ये २५ हजार वैमानिकांकडे व्यावसायिक परवाना आहे. नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी आणि आगामी काळात विमान कंपन्यांच्या ताफ्यात दाखल होणारी विमाने पाहता मोठ्या प्रमाणावर वैमानिकांची गरज भासणार आहे.

वैमानिकांची गरज कशी भागवता येईल?

देशात सध्या ३० पेक्षा जास्त वैमानिक प्रशिक्षण संस्था आहेत. त्यातून वर्षाकाठी ७० च्या आसपास नवे वैमानिक तयार होतात. वैमानिकाचा अनुभव हा त्याने किती तास विमान उडवले याच्यावर ठरतो. केवळ विमान उडवणे शिकले म्हणून लगेच विमान उडवायला लागतो, असे होत नाही. हे नवीन प्रशिक्षित वैमानिक जेव्हा विमान कंपन्यांकडे दाखल होतात, तेव्हा त्यांना पुन्हा विमान कंपनीच्या ताफ्यात असलेल्या विमानाच्या तांत्रिक प्रणालीनुसार प्रशिक्षण दिले जाते. किमान पाच हजार तासांचे उड्डाण झाले की, संबंधित वैमानिक मुख्य वैमानिक होऊ शकतो. मात्र, अर्थातच त्याला अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते.

एक विमान कंपनी दुसऱ्या कंपनीच्या वैमानिकाला नोकरीवर घेण्याची प्रक्रियादेखील क्लिष्ट आहे. कारण एखाद्या कंपनीतून वैमानिकाला बाहेर पडायचे असेल तर किमान एक वर्षाचा नोटीस पिरीयड त्याला भरावा लागतो. कारण एखादा वैमानिक पूर्णपणे तयार करण्यासाठी कंपनी त्याच्यावर किमान ५० लाख रुपयांचा खर्च करते.

English
हिंदी सारांश
Web Title : Pilot Aspirations Soar: Huge Scope in Aviation Sector Now

Web Summary : Indian aviation faces pilot shortage despite airport growth. Indigo's expansion and new aircraft orders heighten demand. Training capacity needs bolstering to meet the rising needs of the industry.
टॅग्स :विमानवैमानिक