युद्ध का संपले हे तुम्हाला माहिती आहे का...?
By अतुल कुलकर्णी | Updated: May 11, 2025 09:32 IST2025-05-11T09:31:01+5:302025-05-11T09:32:34+5:30
परवाच गावाकडून श्यामरावांचा फोन आला. म्हणाले, बाबूराव; युद्ध संपलं म्हणजे काय झालं..? पुढे काय होणार? टीव्हीवर आम्ही काय बघत आहोत...

युद्ध का संपले हे तुम्हाला माहिती आहे का...?
अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई
दादा, काका, मावशी, नमस्कार,
परवाच गावाकडून श्यामरावांचा फोन आला. म्हणाले, बाबूराव; युद्ध संपलं म्हणजे काय झालं..? पुढे काय होणार? टीव्हीवर आम्ही काय बघत आहोत... बाबांनो, युद्ध फार भारी होतं... रामानंद सागर यांची महाभारत, रामायण मालिका तुम्हाला आठवते का? तिकडून आग ओकणारा बाण येतो. लगेच इकडून ढिशं... ढिशं... ढिशं.. आवाज करत पाणी सोडणारे बाण येतात. दोघांची हवेत टक्कर होते आणि आपण जिंकतो... ते हरतात... रात्रभर हे असे चालू होतं. आता बिचारे रामानंद सागर राहिले नाहीत. मात्र, त्यांची उणीव आम्हाला काही मोजक्या चॅनेलनी भासू दिली नाही. रोज तुम्ही संध्याकाळी जेवण झाले की टीव्ही लावून बसत होतात. सासू-सुनांच्या मालिका बघणे बंद झाले होते...
युद्धाची बारीक सारीक तपशीलवार माहिती तुम्हाला प्रत्यक्ष युद्ध लढून आलेले कॅप्टन, लेफ्टनंट कर्नलही देणार नाहीत... त्या गोष्टी तुम्हाला हे लोक घरबसल्या देत होते... रामानंदजींच्या मालिकेमध्ये गरुड पक्ष्यावर स्वार होऊन बाण मारणारे सैनिक तुम्ही पाहिले असतील. आता जमाना हेलिकॉप्टरचा आहे. त्यात बसून बातम्या देणारे रिपोर्टर तुम्हाला येथे दिसले असतील. त्यांनी जी माहिती तुम्हाला दिली ती तुम्ही याआधी कधीही ऐकलेली नव्हती किंवा अन्य कुठेही तुम्हाला तशी माहिती पाहायला मिळालेली नसेल. हे सगळे अद्भुत आणि अलौकिक होते. ही अगम्य दृश्यं सगळ्याच चॅनेलवर दिसली नाहीत. या विषयात ज्यांनी प्रावीण्य मिळवले आहे, असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके निवडक चॅनेलच तुम्हाला यात अग्रभागी दिसले ना....
'चैन से सोना है तो जाग जाये... आपकी नजरे स्क्रीन पर गडे रखीये... ध्वस्त हुआ पाक का सपना.... मनसुबा चूर चूर हुआ... सबसे बडी खबर सिर्फ हमारे पास...' अशा आरोळ्या ठोकत या मंडळीनी तुम्हाला जागतिक दर्जाचं ज्ञान दिलं. तुम्हाला व्हिटॅमिनच्या गोळ्यांची गरजच पडली नसेल... एखादा छोटा ड्रोन जरी पडला तरी 'मार गिराया दुश्मन का ड्रोन... ध्वस्त हुआ पुरा भूभाग...' असे ही मंडळी जेव्हा सांगत होती, तेव्हा उत्साह... जोश... उमंग... तरंग... यासाठी कुठल्याही औषधांची किंवा 'भलत्या' गोळ्यांची गरज पडली नाही....
तुम्ही शिकलेले असलात तरीही तुम्ही उच्च शिक्षणासाठी व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी जॉइन केली असेलच. तिथे अनेक विषयांवरचे मोफत मार्गदर्शन शिबिर सतत सुरू असते. याठिकाणी प्रचंड वेगाने ज्ञानाची गंगा धो-धो वाहत होती. या ज्ञानात तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार डुबक्या मारल्याच असतील... त्यामुळे इतके ज्ञान तुम्हाला मिळाले असेल की, भविष्यात तुम्ही या विषयातले तज्ज्ञ म्हणून व्याख्याने द्याल... आहात कुठे बच्चनजी... कामधाम सोडा आणि पुढेही याच विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून कायम राहा... भविष्यात तुमच्या लेकराबाळांना आम्ही युद्ध बघितले होते, हे सांगण्याची सुवर्णसंधी तुम्हाला चालून आली होती....
या काळात तुम्ही एक फार छान केले... दर १५ मिनिटांनी चॅनेल बदलत गेलात. व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीमधील वेगवेगळ्या ग्रुपमधून मिळणारे ज्ञान दर दहा मिनिटांनी तपासून घेत गेलात. प्रत्येक वेळी, प्रत्येक जण तुम्हाला वेगळी माहिती अफलातूनपणे सांगत होता. युद्ध अगदी तुमच्या दारात, घरासमोर सुरू आहे अशा पद्धतीने ही सगळी मंडळी तुम्हाला एक से बढकर एक अलौकिक अनुभव देत होते...
या कालावधीत फायटिंगवाले किंवा युद्ध दाखवणारे गेम तुम्ही बघितले असतीलच. त्या गेममधले ग्राफिक्स व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीच्या किंवा काही चॅनेलवर दिसणाऱ्या व्हिडीओशी साधर्म्य दाखवणारे वाटले असतील, पण त्या गेमवाल्यांनी याच युनिव्हर्सिटीमधून तसले ग्राफिक्स बनवण्याची प्रेरणा घेतली आहे, हे लक्षात ठेवा. त्यांनी थोडेच व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीमधून डिगऱ्या घेतल्या आहेत..?
जाता जाता एक धोक्याचा इशारा. युद्धाने आम्हाला काय दिलं..? असे प्रश्न या लोकांना विचारू नका... युद्ध..! म्हाताऱ्या आई-बापांना जिवंतपणी अनाथ करतं... युद्ध..! आयुष्याची स्वप्नं पाहणाऱ्या नव्या नवरीच्या कपाळावरचं सिंदूर पुसून टाकतं... युद्ध..! ज्याच्या डोळ्यांनी स्वतःची आई पुरेशी पाहिलेली नाही अशा चिमुकल्यासाठी बिन बापाचं पोर अशी ओळख सोडून जातं... युद्ध..! जिंकलेल्या रणाची.... हरलेल्या मनाची जखम कायम ठेवून जातं... युद्ध..! क्षेपणास्त्रांचा विध्वंस दाखवतो... युद्धात आयुष्य उन्मळून पडलेले म्हातारे आई-बाप... प्रसंगी पोटाला चिमटे देत बांधलेलं त्याचं स्वप्नातलं घर... आणि त्याच घराला बांधलेले स्वप्नांचे तोरण... सारं काही हेच युद्ध क्षणात उद्ध्वस्त करून जातं...
पण लक्षात ठेवा, चॅनलवाल्यांनी आणि व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी हे युद्ध स्वतः सीमेवर जाऊन लढण्याची जबाबदारी पार पाडली... हे कोणासाठी केले त्यांनी..? तुम्हाला सोसायटीत वादविवाद करता यावा, आपलाच मुद्दा कसा बरोबर आहे हे पटवून देता यावा, मित्राच्या पार्टीत दोन ग्लास घेतल्यानंतर आमच्या नेत्याला कळत कसे नाही हे सांगण्याचा अधिकार मिळावा... आपल्याशी वादविवादात आणि चर्चेत कोणीही टिकू शकत नाही हे दाखवता यावे... आपलाच मुद्दा कसा बरोबर आहे... हे शिकवण्यासाठी युद्ध केले गेले... हे लक्षात ठेवा. तुम्ही आता किती ज्ञानवंत झालात, हे व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीमधून तुमचे जे विचार बाहेर पडतील त्यातून दिसेलच. मंडळी, म्हणून युद्ध संपले... तुम्हाला शुभेच्छा..!
- तुमचाच, बाबूराव.