Join us  

Raj Thackeray: दोन देतो का?, तीन देतो का? विचारायला मी काही प्रकाश आंबेडकर नाही!' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 8:10 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलं होतं.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याबद्दल राज ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलं होतं. या संदर्भात त्यांनी कुठलीही स्पष्ट घोषणा केली नसली, तरी विचार सुरू आहे, पुन्हा भेटूच, असं सूचक विधान केलं. कुठल्याही पक्षासोबत आपली चर्चा सुरू नसल्याचा दावा करताना त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला.

लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा सुरू आहे. आपल्या पक्षातल्या नेत्यांशीच चर्चा करतोय. दोन देतो का?, तीन देतो का?, असं विचारायला मी काही प्रकाश आंबेडकर नाही, अशी खिल्ली त्यांनी उडवली. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. त्यावरून राज यांनी हा टोमणा मारला.

लोकसभा निवडणुकीसाठी जो निर्णय मी सांगेन, तो महाराष्ट्रहिताचा, तुमच्या हिताचा, देशाच्या हिताचा असेल. आचारसंहिता लागली की परत भेटूच. काय करायचंय हे निश्चित सांगितलं जाईल, असं राज ठाकरे यांनी जाता जाता जाहीर केलं. त्यामुळे ते स्वबळावर लढणार, की कुणाला बाहेरून पाठिंबा देणार, याबद्दल तर्कवितर्क सुरू झालेत. मनसे वर्धापनदिनाच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. त्यामुळे स्वतः निवडणूक न लढवल्यास ते मोदीविरोधी आघाडीला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जातोय. मात्र त्याचवेळी, परत भेटूच, या त्यांच्या दोन शब्दांमधून ते स्वबळाचा नारा देऊ शकतात, असंही मानलं जातंय. 

राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू असल्याचं बोललं जात होतं. परंतु, आपण कुणालाही कुठलाच प्रस्ताव दिला नसल्याचा दावा राज यांनी केला.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेलोकसभा निवडणूक २०१९