तुमच्याकडेही दोन मतदान कार्ड? तर मग सावधान... दंड, तुरुंगवासाची होईल शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 14:43 IST2025-08-23T14:42:53+5:302025-08-23T14:43:32+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क

तुमच्याकडेही दोन मतदान कार्ड? तर मग सावधान... दंड, तुरुंगवासाची होईल शिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून, ज्यांच्याकडे दोन मतदान ओळखपत्रे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अशा मतदारांना दंड, तुरुंगवासासह मतदानाचाही अधिकार गमवावा लागू शकतो.
अनेकदा कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या पत्त्यांवरून बनवलेले मतदार ओळखपत्र मिळते. एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी राहत असेल, तर त्याला त्या जागी बनवलेले मतदार ओळखपत्र मिळते. तीच व्यक्ती नंतर नोकरी किंवा इतर कारणामुळे दुसऱ्या ठिकाणी बदली होते. त्या व्यक्तीला प्रथम मतदार ओळखपत्र रद्द न करता दुसऱ्या ठिकाणाहून बनवलेले मतदार ओळखपत्र मिळते. एकाच वेळी दोन वेगवेगळे मतदान कार्ड असणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे तुम्हाला शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.
दोन्ही ठिकाणांहून हक्क बजावल्यास बनावट मतदान
दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीत एकाच वाक्तीचे नाव समाविष्ट केले जाऊ शकते. अशा स्थितीत त्या व्यक्तीने दोन्ही ठिकाणांहून मतदान केले तर या स्थितीला बनावट मतदान म्हणता येईल. मतदार यादीत दोनदा नाव आढळून आल्यास तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वेळीच सतर्क होत नाव कमी करून घेणे गरजेचे आहे.
...तर आधार कार्ड लिंक
बनावट मतदान रोखण्यासाठी आणि बनावट मतदार कार्ड ओळखण्यासाठी निवडणूक आयोगाने आधार कार्ड सोबत मतदार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एखाद्या अशा परिस्थितीत व्यक्तीचे एकच मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्यास सांगण्यात आले आहे. बऱ्याचदा मतदार यादीतून नाव गाळले जाऊ शकते. त्यामुळे आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे.
गावाकडचे अन् शहरातले दोन कार्ड
अनेकांकडे गावच्या शहरातील घरच्या पत्त्यावर मतदान कार्ड बनविल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. तर काही जणाकडून बनावट मतदान कार्डचा देखील आधार घेतल्याचे यापूर्वी समोर आले आहे.
असे करा रद्द
तुमच्याकडे दोन मतदार कार्ड असल्यास एक रद्द करण्यासाठी फॉर्म ७ भरून द्या. हा फॉर्म ऑनलाइन किंवा निवडणूक कार्यालयात मिळेल. आपले नाव रह करण्यासाठी आणि त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी आवश्यक तपशील भरावे लागतील. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडे फॉर्म जमा करा.