Join us

नाल्यांमध्ये कचरा टाकल्यास सावधान; CCTV ठेवणार तुमच्यावर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 20:24 IST

नाल्यात कचरा टाकल्यास कारवाई होणार, पालिका प्रशासनाचा इशारा. नाल्यांच्या परिसरात बसवणार सीसीटीव्ही.

ठळक मुद्देनाल्यात कचरा टाकल्यास कारवाई होणार, पालिका प्रशासनाचा इशारा. नाल्यांच्या परिसरात बसवणार सीसीटीव्ही.

मुंबई - नाल्यांची सफाई १०४ टक्के झाल्याचा दावा पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेला. मात्र गाळ काढण्यात आल्यानंतरही नाल्यांमध्ये कचरा, प्लास्टिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नाल्यात कचरा टाकणाऱ्या नागरिकांना दोनशे रुपये दंड करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. नाल्यांच्या परिसरावर वॉच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.नाल्यांमधील गाळ न काढल्यास पावसाळ्यात आसपासच्या परिसरात पाणी भरते, असे दिसून आले आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई केली जाते. मात्र नाल्यांमधील गाळ काढण्यात आल्यानंतरही पुन्हा तेच नाले कचऱ्याने भरलेले दिसून येतात. नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो. यामुळे नाल्यांच्या परिसरावर लक्ष ठेवून कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची सूचना महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली होती. त्यानुसार पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पर्जन्य जलवाहिन्या खात्याला दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या, वस्तू, कचरा इत्यादी नाल्यांमध्ये टाकणाऱ्या व्यक्तीवर महापालिका उप विधीनुसार दोनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रशासनाचा विचार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.यासाठी होणार कारवाई...नाले साफ केल्यानंतरही त्यात कचरा टाकण्यात येत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. यामुळे नाल्यात पाणी तुंबण्याची शक्यता वाढते. विशेष करून प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी पालिकेमार्फत जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. तसेच सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवून दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे केली जाणार आहे. 

टॅग्स :मुंबईकिशोरी पेडणेकरमहापौरपाऊससीसीटीव्ही