Join us  

मुंबईकर सावधान! झाडाखाली उभं राहू नका; पालिकेने दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 9:14 AM

मुंबई महापालिकेकडून पावसाळापूर्व धोकादायक झाडे छाटण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाते, परंतु पावसाळा तोंडावर आला, तरी वृक्ष छाटणी सुरूच असून, त्यामुळे जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका आहे.

मुंबई- पावसाळा म्हटलं तर मुंबईकर रस्त्यात, रेल्वे प्रवासातही सुरक्षित नसतो. मुंबई महापालिकेने झाडांवर पोस्टर्स लावून मुंबईकरांना सूचना केली आहे. मोठा पाऊस आला किंवा जोराचा वादळी वारा आला तर झाडाची फांदी तुटेल अथवा झाडं पडण्याची घटना घडेल. त्यामुळे सावधान राहा. झाडाखाली उभं राहू नका अशा आशयाचे पोस्टर्स माटुंगा विभागात वेगवेगळ्या झाडांना अशाप्रकारे पोस्टर लावण्यात आले आहेत. 

मागील काही वर्षापासून मुंबईत अनेकदा पावसाळ्यात झाडे कोसळून दुर्घटना घडल्याची नोंद आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईत पावसाळा येण्यापूर्वी मुंबई महापालिकेकडून वृक्षछाटणी, नालेसफाई अशाप्रकारची मान्सूनपूर्व कामे केली जातात. मात्र जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मुंबईकरांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागतं. मुंबईच्या अनेक सखळ भागात पाणी साचतं. पाणी तुंबल्यामुळे अनेकदा रेल्वे वाहतूक ठप्प होते. अनेक ठिकाणी झाडे कोसळून दुर्घटना घडतात. उघड्या मेनहॉल्समध्ये पडून लोकांचे जीव जातात त्यामुळे मुंबईकरांनी पावसाळ्यात अतिदक्षता घेणे गरजेचे असते. त्याचपार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मुंबईतील विविध विभागात झाडांवर पोस्टर्स लावून मुंबईकरांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 

मुंबई महापालिकेकडून पावसाळापूर्व धोकादायक झाडे छाटण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाते, परंतु पावसाळा तोंडावर आला, तरी वृक्ष छाटणी सुरूच असून, त्यामुळे जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले. पालिकेच्या वृक्षगणनेनुसार महापालिका क्षेत्रात एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खासगी आवारांमध्ये आहेत, तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत.

या व्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून, उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत. यामध्ये पालिकेची जबाबदारी असलेली झाडांची पालिकेने तर खासगी जागेवरील झाडांची छाटणी त्यांनी करणे अनिवार्य होते, परंतु पावसाळा तोंडावर आला, तरीही झाडांची छाटणी सुरूच आहे. पावसाळ्यात झाडे पडून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

चेंबूर येथे झाड अंगावर कोसळून एक महिला प्रवासी ठार झाली होती. चेंबूरमध्ये अशा प्रकारची ही दुसरी घटना होती. याआधीही स्वस्तिक पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या कांचन नाथ या महिलेवर माडाचे झाड कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे धोकादायक स्थितीत उभी असलेली झाडे मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचं समोर आलं होतं त्यामुळे महापालिकेने खबरदारी म्हणून ही उपाययोजना केली आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाऊसमुंबई मान्सून अपडेट