लसीकरणानंतर सौम्य लक्षणे जाणवल्यास घाबरू नका; डॉक्टरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 03:14 AM2021-01-24T03:14:20+5:302021-01-24T03:14:39+5:30

आरोग्य कर्मचाऱ्यांसह डाॅक्टरांचे आवाहन : मुंबईत लसीकरणाला येतोय वेग

Do not panic if you experience mild symptoms after vaccination; Doctor's appeal | लसीकरणानंतर सौम्य लक्षणे जाणवल्यास घाबरू नका; डॉक्टरांचे आवाहन

लसीकरणानंतर सौम्य लक्षणे जाणवल्यास घाबरू नका; डॉक्टरांचे आवाहन

googlenewsNext

मुंबई : मुंबईत लसीकरण सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी लसीच्या दुष्परिणामांविषयीच्या बाबी समोर आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाची धास्ती घेतली. परंतु, पालिका प्रशासनाने वाॅक इन व्हॅक्सिन सुरू केल्यानंतर हळूहळू लसीकरणाला वेग येत आहे. काही कर्मचाऱ्यांना लसीकरणानंतर सौम्य दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे, मात्र तरीही कोणत्याही प्रकाराला न घाबरता लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आरोग्य कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ डॉक्टरांनी केले.

लसीकरणाविषयीची कर्मचाऱ्यांमधील भीती घालवण्यासाठी पालिकेने समुपदेशन सुरू केले. साेबतच नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही केंद्रावर लस घेण्याची सूट दिली. याचे चांगले परिणाम चौथ्या दिवशी दिसून आले. शुक्रवारी ३,८५२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी बोलावण्यात आले होते. यापैकी तीन हजार ५३९ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी एक लाख २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी कोविन ॲपवर करण्यात आली. मात्र पहिल्या दिवशी १६ जानेवारी रोजी चार हजार कर्मचाऱ्यांपैकी १,९२६ कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. तर दुसऱ्या दिवशी १,५९७ आणि तिसऱ्या दिवशी १,७२८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. शुक्रवारी यात तब्बल ४० टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे दिसून आले.

लसीकरणाचे गांभीर्य ओळखले पाहिजे

लसीकरणानंतर काही तासांनंतर अंगदुखीचा त्रास झाला होता. मात्र कोणत्याही लसीकरणानंतर अशा प्रकारे सौम्य लक्षणे जाणवत असतात. त्यामुळे याला घाबरून न जाता प्रत्येकाने लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. - डॉ. सागर चौरसिया,  खासगी रुग्णालय

लसी घेतल्यावर दुसऱ्या दिवशी ताप आला. मात्र ताप येणे ही अत्यंत सामान्य व सकारात्मक बाब आहे. लसीकरणादरम्यान अत्यंक अपवादात्मक स्थितीत एखाद्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते, म्हणून लसीकरण टाळणे हा उपाय नाही याचे गांभीर्य ओळखले पाहिजे. - वरिष्ठ परिचारिका, पालिका रुग्णालय

लस घेतल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला निरीक्षण कक्षात थांबविले जाते. त्यानंतर काहीही न झाल्यास रुग्णालय कक्षातून सोडण्यात येते. लसीकरणाचे दुष्परिणाम जाणवल्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. लसीकरणानंतरही अंगदुखी आणि ताप आला होता, परंतु लस शरीराला सूट झाल्याची ही लक्षणे आहेत. त्याला न घाबरता सामोरे जावे, आराेग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी पुढे यावे. - शैलेश, लसीकरण 
विभाग, पालिका रुग्णालय

कोविन ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे मेसेज येत नसतील तरी मेसेजची वाट पाहू नका. नावनोंदणी झाली का, हे तपासून लस घ्या. पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना केवळ कोविन ॲपमधील नोंदणी पडताळूनच लस मिळणार आहे. कोविन ॲपद्वारे नावनोंदणी झाल्यानंतर ज्या झोनमध्ये लसीकरणासाठी नाव येत असेल त्या झोनमधील कोणत्याही लसीकरण केंद्रावर जाऊन लस मिळणार आहे.
- सुरेश काकाणी,  पालिका अतिरिक्त आयुक्त

कोणत्याही लसीकरणानंतर रिॲक्शन येत असते. सौम्य स्वरूपात ताप येणे हा एक प्रकारे सकारात्मक प्रतिसाद असताे. लसीकरणानंतर शरीरात प्रतिसाद सुरू झाला, हे त्यातून दिसून येते. गंभीर रिॲक्शन ही लसीकरणानंतर अर्ध्या तासातच येत असते.     - दीपाली पाटील, परिचारिका
 

Web Title: Do not panic if you experience mild symptoms after vaccination; Doctor's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.