Join us

युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून कुणी राजकीय फायदा घेऊ नये; राज ठाकरेंचा मोदी सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 14:21 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबईः पुलवामा हल्ल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि पाकमधील वाद वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर एअर स्ट्राइकची कारवाई केली गेली. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरेंनी ट्विटरवरून अशा मुद्द्यांचं राजकारण करू नये, असं आवाहन केलं आहे.राज ठाकरे म्हणाले,  युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईल आणि काश्मिरी जनता देखील भरडली जाईल. हे कोणालाच परवडणारं नाही. अतिरेक्यांना ठेचलेच पाहिजे आणि ते देखील निष्ठुरपणे म्हणून युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून राजकीय फायदा पण कोणी घेऊ नये. दोन्ही देशांत ज्या समस्या आहेत त्यावर चर्चेतून मार्ग काढावा आणि दोन्ही देशांत शांततेचं वातावरण निर्माण व्हावं हीच इच्छा आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की युद्ध अथवा युद्धजन्य परिस्थिती हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही, आणि त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्याही उमद्या राजकारण्याचं लक्षण असू शकत नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं. राज ठाकरेंनी मोदींसह विरोधकांनाही या प्रश्नाचं राजकारण करू, नये असं आवाहन केलं आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचं केलेलं आवाहन माझ्या पाहण्यात आलं. अशा प्रकारचं आवाहन त्यांनी पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतरही केलं होतं. या हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई सेनेने जो हल्ला चढवला तो आवश्यक होता. त्याबद्दल मी भारतीय हवाई दलाचं अभिनंदन देखील केलं होतं. काल पुन्हा इम्रान खान यांनी चर्चेचं आवाहन केलं आहे आणि इतकंच नव्हे तर त्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यापासून सर्व मुद्द्यांवर चर्चेत तयारी दर्शवली आहे. अशा प्रकारे चर्चेतून मार्ग काढण्याची संधी स्व. अटलबिहारी वाजपेयीजी आणि परवेझ मुशर्रफ यांच्या काळात आली होती. अटलजींनी सदा-ए-सरहद ही लाहोरपर्यंतची बससेवा सुरू केली. समझौता एक्स्प्रेस सुरू केली, याचाही उल्लेख राज ठाकरेंनी केला आहे.  

टॅग्स :राज ठाकरेपुलवामा दहशतवादी हल्लाएअर सर्जिकल स्ट्राईक