Join us  

पत्रकारांच्या सापळ्यात अडकू नका, सावध राहा; प्रसिद्धी यंत्रणेला भाजपकडून टिप्स

By यदू जोशी | Published: March 10, 2024 5:50 AM

अनेक टिप्स भाजपच्या लोकसभा प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समितीने प्रसिद्धीची जबाबदारी असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी पाठविल्या आहेत. 

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘तुम्हाला सापळ्यात अडकविण्यासाठी पत्रकारांकडून उलटसुलट प्रश्नांची सरबत्ती केली जाईल. त्यांची उत्तरे देताना सावधगिरी बाळगा, पत्रकारांच्या सापळ्यात अडकू नका. घाईघाईने उत्तरे देण्याच्या नादात नवा वाद किंवा वादंग निर्माण करू नका, अशा अनेक टिप्स भाजपच्या लोकसभा प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समितीने प्रसिद्धीची जबाबदारी असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी पाठविल्या आहेत. 

पत्रपरिषदेत वा टीव्हीवरील चर्चेत बोलताना तुम्ही मांडणार असलेल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे सोबत न्यावे. बोलताना तुमची देहबोली आत्मविश्वासपूर्णच असली पाहिजे. कोणी आपल्या पक्षाच्या विरोधात बोलत असताना तुम्ही कोणत्याही प्रकारचे संतप्त भाव, नकारात्मक भाव चेहऱ्यावर येऊ देता कामा नये, असे बजावण्यात आले आहे. 

पत्रकारांशी बोलताना अत्यंत सावध राहा, पक्षाच्या धोरणाविरोधात, भूमिकेविरोधात एकही शब्द तोंडून निघणार नाही याकडे लक्ष द्या. ‘ऑफ द रेकॉर्ड’ बोलणे टाळा. मुद्द्याचे बोला, अघळपघळ बोलू नका. अडचणीचा प्रश्न आला तरी न चिडता संयमाने उत्तर द्या. बोलताना योग्यवेळी आवाजाचा चढउतार साधा. प्रश्नोत्तरांसह कोणतीही पत्रपरिषद ४५ मिनिटांमध्ये संपवा, असा सल्लाही देण्यात आला आहे.

कपडे कोणते? प्रेस कधी घ्यायची?

- टीव्ही चॅनलवर चर्चेला जाताना आपल्या पेहरावाकडे विशेष लक्ष द्या. पांढरे शुभ्र किंवा काळे भडक कपडे टाळा. अशा चर्चेत आपल्या पक्षाच्या विरोधात होणारी वक्तव्ये शांतपणे ऐकण्याची तयारी ठेवा.

- सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेतलेल्या पत्रपरिषदेला चांगली प्रसिद्धी मिळते म्हणून शक्यतो याच वेळेत पत्रपरिषदा घ्या, अशी सूचनाही करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४भाजपा