Join us  

गृहनिर्माण सोसायटीत कामगारांना प्रवेश नाकारू नका; अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 5:26 PM

गृहनिर्माण सोसायटीत कामगारांना प्रवेश नाकारू नका; अन्यथा शिवसेना स्टाईलने जाब विचारणार...

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : राज्य सरकारने गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घरकामगार व वाहनचालकांना प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही , असे जाहीर केल्यानंतरही घरकाम करणाऱ्या महिला , ड्रायव्हर , सफाई कामगार यांना कामावर न घेण्याचे प्रकार सुरुच आहेत. झोपडपट्टी परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर , गोरेगाव पश्चिम येथील काही सोसायट्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याची तक्रार शिवसेनेकडे करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे आधीच तब्बल तीन महिने या घरकामगार महिलांना रोजगार नसल्याने त्यांच्या घरातील चुली थंडावल्या आहेत. लॉकडाऊन काही प्रमाणत शिथील झाल्यानंतर महिलांनी पुन्हा कामावर जाण्यास सुरुवात केली , मात्र आता सोसायटांच्या आवारातही घेतले जात नाही. अनेक इमारतींमध्ये घरमालक तयार आहेत , पण सोसायटांच्या पदाधिकारी विरोध करत असल्याची माहिती शिवसेनेचे गोरेगाव विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी दिली. 

वर्तमानपत्रे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कोरोनाच्या काळात वाचकांना अचूक महिती देत महत्वाची भूमिका बजावत आहे. शासनाने घरोघरी वृतपत्रे वाटण्यास बिनशर्त परवानगी दिल्यानंतर देखिल येथील गोरेगावच्या काही गृहनिर्माण सोसायट्या वृत्तपत्र विक्रेत्यांना मनाई करतात.तर काही सोसायट्या या वृत्तपत्र विक्रेत्यांना गेटवर

वर्तमानपत्रे ठेवण्यास सांगतात अश्या तक्रारी शिवसेनेकडे आल्या आहेत. या विरोधात देखिल त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वाचकांना वृत्तपत्र वाचण्यापासून गृहनिर्माण सोसायट्या रोखू शकत नाही. जर असे प्रकार घडल्यास स्वतः शिवसैनिक वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि त्यांना वृत्तपत्रे घरोघरी वितरण करण्यास सहकार्य करतील अशी माहिती दिलीप शिंदे  यांनी लोकमतला दिली.

कुठल्याही कामगाराचा रोजगार नाकारता येणार नाही , असे  सरकारने स्पष्ट केल्यानंतरही सोसायट्या जर अश्याप्रकारने आडमुठेपणा करणार असतील , तर शिवसेनेशी गाठ आहे. सोसायटीत जर कामगारांना प्रवेश नाकारल्यास शिवसेना स्टाईलने सोसायट्याच्या अध्यक्ष व सचिवांना जाब विचारला जाईल, असा ठोस इशारा त्यांनी येथील गृहनिर्माण सोसायट्यांना दिला आहे.

गोरेगाव पश्चिम येथील जवाहर नगर, संक्रमण शिबीर, उदय सोसायटी, राममंदिर, ज्ञानेश्वर नगर, गांधी चाळ , लक्ष्मीनगर , आझादनगर , भगतसिंग नगर या झोपड पट्ट्यांतील असंख्य महिला या भागातील इमारतीमध्ये घरकाम करण्यासाठी जातात. मात्र  झोपडपटी परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्यानंतर त्यांना तसेच वाहनचालक , सोसायट्यांमध्ये साफसफाई करणारे कामगार याना कामावर घेतले जात नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. येथील धीरज, साई,  गार्डन इस्टेट, इंपिरियल, कपिल , वसंत गॅलेक्सी, यासह विविध सोसायटयांमध्ये महिला कामगार व इतरांना मनाई करण्यात येत असल्याची माहिती दिलीप शिंदे यांनी दिली .

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉक