सत्तेत आहात म्हणून मनमानी करू नका, उच्च न्यायालयाने केली शिवसेनेची कानउघाडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 05:02 IST2020-01-11T05:02:13+5:302020-01-11T05:02:39+5:30
मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पाणीपुरवठादाराला पाणीपुरवठा न करण्याचा आदेश दिल्याने संतापलेल्या न्यायालयाने अध्यक्षांना चांगलेच सुनावले.

सत्तेत आहात म्हणून मनमानी करू नका, उच्च न्यायालयाने केली शिवसेनेची कानउघाडणी
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टला पाणीपुरवठा करणाऱ्या हार्बर वॉटर सप्लायर्स सर्विसेसला पाणीपुरवठा ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला असतानाही मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पाणीपुरवठादाराला पाणीपुरवठा न करण्याचा आदेश दिल्याने संतापलेल्या न्यायालयाने अध्यक्षांना चांगलेच सुनावले. अधिकार नसतानाही असा निर्णय घेतला कसा? हा कारभार खपवून घेणार नाही. सत्तेत आहात म्हणून मनमानी करू नका, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने महापालिका व राज्यात सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेची कानउघाडणी केली
एमबीपीटीला लाखो लीटर पाण्याचा बेकायदेशीर पुरवठा होत असल्याचे कारण देत स्थायी समिती अध्यक्षांनी हार्बर वॉटर सप्लायर्स सर्विसेस लि. व ओक मरिन या पाणी पुरवठादारांचा पाणीपुरवठा बंद केला. त्याविरोधात दोघांनीही न्यायालयात धाव घेतली. न्या. एस. काथावाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे या याचिकांवरील सुनावणी होती.
याआधीच उच्च न्यायालयाने या दोन्ही पाणी पुरवठादारांचा पाणीपुरवठा ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला असतानाही महापालिकेने त्या आदेशाचे उल्लंघन करून पाणीपुरवठा बंद करण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या आदेशाला बगल देत स्थायी समिती अध्यक्षांनी अधिकार नसतानाही पाणीपुरवठा बंद करण्याचा आदेश दिला कसा? अध्यक्षांचा हा कारभार खपवून घेणार नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने स्थायी समिती अध्यक्षांनी पाणीपुरवठा बंद करण्याचा दिलेला आदेश रद्द केला.