Join us  

'जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान आई-वडिलांनी मला दिलं'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 1:23 PM

मी गेल्या काही वर्षांत आक्रमकपणा कमी केला, स्वत:च्या स्वभावाला मुरड घातली, पण यापुढेही माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी आयुष्यात तत्त्वांशी तडजोड करणार नाही. तत्त्वांना तिलांजली दिली तर ते माझ्या पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखे होईल

ठळक मुद्देमी गेल्या काही वर्षांत आक्रमकपणा कमी केला, स्वत:च्या स्वभावाला मुरड घातली, पण यापुढेही माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी आयुष्यात तत्त्वांशी तडजोड करणार नाही. तत्त्वांना तिलांजली दिली तर ते माझ्या पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखे होईल

यदु जोशी

मुंबई - महाराष्ट्र सरकारने 26 ऑगस्ट रोजी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. आपल्या १५ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत तुकाराम मुंढे यांच्या १४ बदल्या झाल्या आहेत. धडाकेबाज निर्णय घेणारे अधिकारी अशी त्यांची ओळख आहेच, पण राजकारण्यांसोबतचं त्यांचं हेकेखोर वागणंही नेहमीच चर्चेचा विषय ठरलंय. ते कुणालाच जुमानत नाही, स्वतःचंच घोडं पुढे दामटतात, हुकूमशाहीनं वागतात, अशी तक्रार ते जिथे-जिथे गेले तिथल्या नेतेमंडळींनी केलीय. आता, मुंबईतील जीवन प्राधीकरण विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

निडर आणि कडक शिस्तीचा आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुंढे यांनी हाल अपेष्ट सहन करत यशाची उंची गाठली आहे. मूळचे बीड जिल्ह्यातील ताडसून्न या गावचे ते आहेत. गावची लोकसंख्या सर्वसाधारणपणे पाच हजाराच्या आसपास. अशा लहानशा गावखेड्यातून आलेल्या मुंढेंनी प्रशासकीय सेवेतील जोरावर महाराष्ट्रात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलंय. मात्र, शेती-मातीशी जुळलेली नाळ आणि आई-वडिलांनी केलेले संस्कार हेच माझ्या कामाची शिदोरी असल्याचं ते सांगतात. 

मी गेल्या काही वर्षांत आक्रमकपणा कमी केला, स्वत:च्या स्वभावाला मुरड घातली, पण यापुढेही माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी आयुष्यात तत्त्वांशी तडजोड करणार नाही. तत्त्वांना तिलांजली दिली तर ते माझ्या पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखे होईल, अशी भावना व्यक्त करतानाच नागपूर महापालिका आयुक्तपदावरून माझी बदली व्हावी, असा मी काय गुन्हा केला होता, असा सवाल तुकाराम मुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. नागपूरमधील बदलीनंतर तुकाराम मुंढेंनी त्यांच्या सर्वात पहिली मुलाखत लोकमतला दिली. शेतकरी आई-वडिलांच्या संस्कारातच आपली जडणघडण झाली आहे. जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं भलं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान त्यांनी मला दिलं. त्यानुसार मी यापुढे चालत राहीन, असेही मुंढेंनी म्हटले.   व्हॉट इज नेक्स फॉर मिस्टर मुंढे?

मुंढे - सात महिन्यांत मी नागपुरात रिझल्ट दिले. सरकारने बदलीचा आदेश दिला आहे पण खरं सांगू लोकांचा थेट संबंध असलेल्या संस्थांमध्ये काम करणे मला नेहमीच आवडेल.प्रत्येक ठिकाणी किमान दोन वर्षे तरी मिळाली पाहिजेत. कारण समाजात असंख्य नागरी प्रश्न आहेत आणि कुठलाही दबाव सहन न करता काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची तेवढीच आवश्यकता आहे. माझे आईवडील शेतकरी. जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं भलं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान त्यांनी मला दिलं. त्यानुसार मी चालत राहीन.

नागपुरात माझ्याविरोधात कुठलेही मुद्दे मिळत नाहीत म्हटल्यानंतर माझ्या चारित्र्यहननाचे प्रकार घडविण्यात आले. महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेण्याचे प्रकार घडले,असा गौप्यस्फोट मुंढे यांनी केला. दररोज माझ्याविरुद्ध आरोप केले जात होते, पद्धतशीरपणे मला टार्गेट करण्यात आले. माझे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न चारपाच महिने झाले. असे का करण्यात आले? त्यात भाजपचे लोक होते, दुसरे कोण करणार तुम्हीच सांगा, असा सवाल मुंढे यांनी केला. मुंढे सध्या कोरोनाग्रस्त असून नागपुरात होम क्वारंटाइन आहेत. तिथून त्यांनी संवाद साधला. 

टॅग्स :मुंबईनागपूरतुकाराम मुंढेबीड