Join us

Diwali: पोलीस बांधवांनाही दिवाळी बोनस द्या, मनसेचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 12:38 IST

Diwali: कोरोना काळात महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस देण्यात आला होता. तेव्हाही पोलिसांची दमछाक झाली

मुंबई - दिवाळी सणाला देशभरात, राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस देत त्यांच्या कुटुंबाची दिवाळी गोड केली जाते. खासगी क्षेत्रातील, कॉर्पोरेट कंपन्याही कर्मचारी, कामगारांना दिवाळीचा बोनस देत असते. या सर्वांची दिवाळी बोनसमुळे आनंदात जात असली तरी राज्यातील पोलीस विभाग या निर्णयाला अपवाद आहे. करोना काळात जीव धोक्यात घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या राज्यातील पोलिसांना ना बोनस मिळतो ना अॅडव्हान्स, त्यामुळे पोलीस खात्यात दिवाळीला नाराजीचा सूर पाहायला मिळतो. मात्र, मनसेनं दिवाळीला पोलिसांनाही बोनस देण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. 

सणवार असो, कोणतीही आपत्ती असो की संकट असो, सदैव सतर्क आणि कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील पोलीस बांधवांची दिवाळी त्यांना देखील बोनस देऊन गोड करावी, अशी मागणी पक्षाचे सरचिटणीस मनोज चव्हाण ह्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

महाराष्ट्र पोलीस बांधव हे सण, उत्सव, नैसर्गिक आपत्तीसह अतिरेकी कारवायांमध्ये कर्तव्य बजावत असतात. गर्दीत वर्दी असते म्हणूनच धर्माचा उत्सव उत्साहात साजरा होतो. त्यामुळेच, सणासुदीच्या काळाततरी महाराष्ट्र पोलिसांना आर्थिक समाधान द्यायला हवे, असे मनोज चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, यंदा दिवाळीला पोलिस बांधवांना बोनस द्यावा, अशी मागणीच पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणूक भाजपने न लढविण्याची मागणी केली होती, ती मागणीही मान्यही करण्यात आली होती. 

कोरोना काळात महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस देण्यात आला होता. तेव्हाही पोलिसांची दमछाक झाली, मात्र पोलिसांनी काही मिळाले नव्हते. गतवर्षी केवळ ७५० रुपयांचे कुपन पोलिसांना देण्यात आले होते. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आर.आर. चव्हाण या पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून पोलिसांना एक महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्याची मागणी केली आहे. हे पत्र मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री कार्यालय, अर्थमंत्री कार्यालय आणि राज्याचे पोलीस महासंचालक कार्यालय अशा विविध कार्यालयांना पाठवण्यात आले आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसपोलिसमुंबईदिवाळी 2022