मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत सायकल वाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 19:02 IST2021-10-24T19:01:46+5:302021-10-24T19:02:57+5:30
पहिल्या टप्प्यात अंधेरी-जोगेश्वरी भागातील सुमारे अडिचशे ते तीनशे डबेवाल्यांना सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या. हा कार्यक्रम आज जोगेश्वरी पश्चिमेला असलेल्या एच के इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी सेंटरच्या मैदानावर पार पडला.

मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत सायकल वाटप
मुंबई- कोरोना महामारीचा संपूर्ण जगालाच मोठा फटका बसला आहे. यातच हातावर पोट असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांवरही कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर, डबेवाल्यांना आपला व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी एचएसबीसी बँकेकडून मोफत सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात अंधेरी-जोगेश्वरी भागातील सुमारे अडिचशे ते तीनशे डबेवाल्यांना सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या. हा कार्यक्रम आज जोगेश्वरी पश्चिमेला असलेल्या एच के इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी सेंटरच्या मैदानावर पार पडला. पुढील आठवडाभरात संपूर्ण मुंबईतील डबेवाल्यांना सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
कोरोना काळात संपूर्ण जगाचे व्यवहार ठप्प झाले असताना मुंबईचा डबेवाल्यावर देखील उपासमारीची वेळ आली होती. असंघटित कामगार असणाऱ्या या डबेवाल्यांना विविध एनजीओ आणि कंपन्यांच्या माध्यमातून रेशन किटचे वाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी एचएसबीसी बँकेने मुंबई डबेवाल्यांसाठी सीएसआर फंडातून पंधरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यातूनच मुंबई डबेवाल्यांना रेशन, डबेवाल्यांच्या मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळावे यासाठी टॅब वाटप आणि डबेवाल्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा यासाठी नव्या सायकली उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शिवाय मुंबई डबेवाल्यांना मोबाईलदेखील उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.