Join us
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी रुग्णालयांतील ८२,९७३ खाटांचे चार महिन्यांत वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 18:40 IST

Corona News : पालिकेच्या वॉर्ड वॉर रूममार्फत नियोजन

मुंबई - खाजगी रुग्णालयांतील राखीव खाटांचे वितरण महापालिकेच्या विभागातील वॉर रूममार्फत केले जाते. या नियमांचे उल्लंघन करीत परस्पर कोरोना बाधित रुग्णांना दाखल करणाऱ्या खाजगी रुग्णालयांचे प्रशासनाने नुकतेच कान टोचले. मात्र जून ते ३० सप्टेंबर २०२० या चार महिन्यांमध्ये खाजगी रुग्णालयांतील ८२ हजार ९७३ बाधित रुग्णांना खाटांचे वितरण पालिकेने केले आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या एप्रिल - मे महिन्यात वाढल्यानंतर खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे जूनपासून पालिका, शासकीय आणि खाजगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटांचे वितरण २४ प्रशासकीय विभागातील वॉर रूममार्फत करण्यात येत आहे. त्याचबरोबर बाधित रुग्ण, त्यांचे नातेवाईकांना व निकटच्या संपर्कातील व्यक्तिंचे, स्थानिकांचे दूरध्वनीद्वारे समुपदेशन केले जात आहे. अति जोखीम गटातील व्यक्तिंशी संपर्क साधून त्यांनाही समुपदेशन ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे करण्यात येत आहे.

अशा पद्धतीने होते खाटांचे वितरण : रुग्ण ज्या विभागातील असेल, त्या विभागाच्या ‘वॉर्ड वॉर रुम’ द्वारे खाटांचे वितरण करण्यात येत आहे. सर्व २४ ‘वॉर्ड वॉर रुम’ या एका संगणकीय प्रणाली आधारित ‘डॅश बोर्ड’शी जोडलेल्या असून त्यामध्ये रुग्णालयातील उपलब्ध खाटांची माहिती नियमितपणे अद्ययावत करण्यात येत आहे. विभागातील बाधित रुग्‍णाची माहिती आल्यानंतर अशा रुग्‍णाला संबधित विभागाच्या ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे दूरध्वनी करून रुग्णालयातील उपलब्धतेनुसार खाटेचे वितरण केले जाते.

वॉर रूममधील व्यवस्था : १९१६ या दूरध्वनी क्रमांकाद्वारे केंद्रीय खाटा वितरण पद्धत सुरु करण्यात आली. मात्र, रुग्णांची संख्या वाढल्यानंतर सर्व २४ विभागांमध्ये ‘वॉर्ड वॉर रुम’ सुरु करण्यात आले. त्यांच्याद्वारे विभाग स्तरावर विकेंद्रीत पद्धतीने जून २०२० पासून खाटांचे वितरण सुरु करण्यात आले. मुंबईतील २४ ‘वॉर्ड वॉर रुम’ मध्ये प्रत्येक पाळीत प्रत्येकी ८ ते १०, यानुसार तीन पाळ्यांमध्ये २४ ते ३० कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये डॉक्टरांसह महापालिकेच्या विविध खात्यातील कर्मचा-यांचा समावेश आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकोरोना वायरस बातम्यालॉकडाऊन अनलॉकमुंबई